ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5 - फेसबुक फ्रेण्डवर विश्वास करून त्याला सर्वस्व सोपविणे एका तरुणीला मोठे महागात पडले. तिने दूर होताच त्याने तिला ब्लॅकमेल करून तिच्यापासून चार लाख रुपये हडपले. त्याच्याकडून होणाऱ्या मानसिक यातना असह्य झाल्यामुळे अखेर या तरुणीने आरोपी सौरव विश्वनाथ मंडळ (वय २४) याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला.
आरोपी मूळचा बरकपूर कोलकाता येथील रहिवासी आहे. पीडित तरुणी (वय २१) अंबाझरीतील वसतिगृहात राहत होती. जुलै २०१३ मध्ये ते एकमेकांचे फेसबुक फ्रेण्ड बनले. त्यानंतर निरंतर संपर्काने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी मंडळने तिला रामदासपेठमधील हॉटेल चिदंबरासह विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी शरीरसंबंध जोडले. त्याची क्लिपींगही तयार केली.
हळूहळू त्याचे खरे रूप कळल्यामुळे तरुणी त्याच्यापासून दूर झाली. त्यामुळे आरोपी तिला छळू लागला. त्याने तिला धमकावून रक्कम हडपणे सुरू केले. मुलीचे आईवडील शिक्षणाच्या नावाखाली तिला रक्कम पाठवत होते. मंडळने तीन वर्षात तिच्याकडून चार लाख रुपये हडपले. एवढेच नव्हे तर फोटो अन् क्लिप दाखवून तो तिला नेहमी ब्लॅकमेल करून शरीरसंबंध जोडत होता. बनावट आयडी बनवूनही तो तिला पैशासाठी त्रास देत होता. पालकांनी वाढवला विश्वासमुलगी वारंवार पैसे मागत असल्याने आईवडिलांना संशय आला. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा तिच्या भावनांचा बांध फुटला. तिने दिलेल्या माहितीमुळे हादरलेल्या मातापित्याने नागपूर गाठून तिला आश्वस्त केले. यानंतर पीडित तरुणीने अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली मंडळविरुद्ध गुन्हा दाखल केला.