मुंबई : फेसबुकवर चॅटिंग करीत झालेली मैत्री मालाड येथील एका शिक्षिकेला भलतीच महागात पडली आहे. तब्बल सव्वापाच लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर या शिक्षिकेने केलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी कोनार गिप्सन या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मालाड येथे राहणार्या या शिक्षिकेसोबत चॅटिंग करताना कोनार गिप्सन या इसमाने आपण लंडन येथील सिव्हिल इंजिनीअर असल्याची बतावणी केली होती. या चॅटिंगमधून त्यांची आॅनलाइन मैत्री झाली. चॅटिंगच्या दरम्यान आपण सध्या भाड्याच्या घरात राहत असून आपली आर्थिक स्थिती जेमतेमच असल्याचे या शिक्षिकेने या कोनार गिप्सनला सांगितले होते. त्यावर आपण भारतात आल्यावर तुझी भेट घेऊन तुला एक फ्लॅट घेऊन देईन, असे आश्वासन त्याने या शिक्षिकेला दिले होते. गेल्या २७ एप्रिलला गिप्सनने शिक्षिकेला फोन करून आपण २८ एप्रिलला मुंबईत येत असल्याचे सांगितले होते. त्या दिवशी गिप्सनने फोन करून आपण दिल्ली विमानतळावर उतरलो असून कस्टम तपासणीत सामान, पासपोर्ट आणि सामानासह चलन अधिक प्रमाणात असल्याने थांबवण्यात आले असून अंजिता शर्मा या महिला कस्टम अधिकार्याशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर तासाभराने आपले नाव अंजिता शर्मा असल्याचे सांगून एका महिलेने शिक्षिकेशी मोबाइलवर संपर्क साधला आणि गिप्सनकडे साडेतीन लाख पौंड इतके चलन असल्याने त्याला ८७ हजार रुपये दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. गिप्सनकडे भारतीय चलन नसल्याने ही रक्कम शिक्षिकेला बँक खात्यात भरण्यास सांगून खाते क्रमांकही दिला. त्यानुसार शिक्षिकेने ८७ हजार रुपये त्या खात्यात भरले. त्यानंतर अंजिता शर्मा हिने गिप्सनला सोडण्यात आल्याचे शिक्षिकेला कळवले. मात्र पुन्हा अंजिता शर्माने फोन करून यूके दूतावासाने गिप्सनला भारतात प्रवेश करू देण्यासाठी शिक्षिकेला दुसर्या एका बँक खात्यात १ लाख ५२ हजार रुपये आणि २ लाख ८५ हजार रुपये दोन वेगवेगळ््या बँक खात्यांमध्ये भरण्यास सांगितले. शिक्षिकेने आपल्या नातेवाइकांकडून ही रक्कम बँकेत भरली. असे एकूण ५ लाख २४ हजार रुपये जमा केल्यानंतर पुन्हा सबिना मिश्रा नावाच्या महिलेने पौंड भारतीय चलनात देण्यासाठी ४ लाख ६५ हजार रुपये बँकेत भरण्यास सांगितले. त्यावर शिक्षिकेने ती रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यानच्या काळात शिक्षिकेच्या पतीने दिल्ली येथील ब्रिटिश एअरवेजच्या कार्यालयात फोन करून कोनार गिप्सन या नावाचा कुणी प्रवासी भारतात आला का, याची चौकशी केली असता त्या नावाचा कुणीही प्रवासी आला नसल्याचे स्पष्ट केले. कस्टम कार्यालयातूनही अंकिता शर्मा नावाची अधिकारी नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षिकेने त्याबाबत मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मालाड पोलिसांनी सायबर क्राइम सेलमार्फत या प्रकरणाची खातरजमा करून घेत याबाबत गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सोनावणे याबाबत अधिक तपास करीत आहेत. अशाच प्रकारे आॅनलाइन फसवणुकीचे अनेक गुन्हे होत असल्याने यात सहभागी असलेल्या टोळ््यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना सादर केले आहे. (प्रतिनिधी)
फेसबुक मैत्री शिक्षिकेला भोवली
By admin | Published: May 19, 2014 3:13 AM