ऑनलाइन लोकमत, मुंबई
सोशल मीडियामधली जगातली अग्रेसर कंपनी फेसबुक आणि बातमीविश्वातील महाराष्ट्रातील अग्रणी लोकमत एकत्र येताहेत राज्यातल्या प्रत्येक युवकाशी जोडलं जाण्यासाठी. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर हा पुरस्कारसोहळा बघण्यासाठी महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती आतूर झालेली आहे. मुंबईमध्ये रंगणाऱ्या या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण फेसबुकच्या साथीने घराघरामध्ये पोचवण्यात येणार आहे.
युपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
आज, कम्प्युटर, मोबाइल व इंटरनेट यांच्या संगमामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात तंत्रज्ञानाची क्रांती होत आहे. जगभरातल्या ताज्या घडामोडी एका क्षणात आपल्या हातातल्या मोबाईलवर अवतरत आहेत. या मोबाइल क्रांतीमध्ये भारतही आता मागे नाही...
काय आहे भारतातल्या स्मार्ट फोन्सची स्थिती?
आजच्या घडीला जगभरातील एक तृतीयांश जनता स्मार्टफोन वापरते. त्याचेच प्रतिबिंब भारतातही पडलेलं आहे. भारतामध्ये आजच्या घडीला 30 कोटी लोक स्मार्टफोन वापरतात. याचाच अर्थ जवळपास 30 कोटी लोकं इंटरनेटनं जोडली गेली आहेत आणि ते बातम्या, मनोरंजन, सोशल मीडिया अशा विविध कारणांसाठी मोबाईलचा वापर करत आहेत. येत्या काही वर्षांत भारतातली स्मार्टफोनधारकांची संख्या 50 कोटीच्या आसपास जाईल असा अंदाज आहे, त्यामुळेच आता मेड इन इंडिया मोबाईलचं युगही सुरू झालं आहे. एका अंदाजानुसार 2016मध्ये सुमारे 8 कोटी मेड इन इंडिया स्मार्टफोन भारतीय बाजारात विकले गेले. यावरून भारतात मोबाईल क्रांतीला सुरूवात झाली आहे असे मानण्यास प्रतिवाद नसावा.
काय आहे भारतातल्या फेसबुकची स्थिती?
आजच्या घडीला जगभरातल्या फेसबुक वापरकर्त्यांची संख्या 1.85 अब्ज किंवा 185 कोटी आहे. तर, भारतामधली फेसबुक वापरकर्त्यांची संख्या 15 कोटीच्या घरात आहे. यावरून लक्षात येतं फेसबुकच्या एकूण युजर्समध्ये फक्त भारतीयांचा वाटा 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि त्यात दरवर्षी वाढ होत आहे. सध्या भारतामध्ये विशेषत: शहरी भागामध्ये सोशल मीडिया पूर्णपणे फोफावला आहे, आणि दरदिवशी निमशहरी व ग्रामीण भागामध्ये जोमाने वाढ होत आहे. महाराष्ट्राचा विचार केला मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या भागांमध्ये ब्रॉडबँड विस्तारत आहे, 3G व 4G तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेटचा अतिवेगाने प्रसार होत आहे. आणि त्या अनुषंगाने सोशल मीडिया व अन्य डिजिटल मीडिया प्रसार पावत आहे.
फेसबुक व लोकमत एकत्र येणं म्हणजे वाचकांसाठी पर्वणी
डिजिटल व सोशल मीडियाच्या वापरामध्ये तरूण पिढी आघाडीवर आहे. या माध्यमांचा कम्प्युटर व मोबाईलच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्यांमध्ये तब्बल 80 टक्के वाटा हा तरूणांचा आहे. हा युवा वाचक प्रत्येक क्षणाला बारकाईने ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतो. त्याची हीच गरज ओळखून फेसबुक व लोकमत एकत्र आले आहेत, वाचकांना महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर हा पुरस्कार सोहळा लाइव्ह दाखवण्यासाठी... हा पुरस्कार सोहळा असणार आहे सत्ता, कर्तृत्व आणि ग्लॅमरचा त्रिवेणी संगम. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती घेणार आहेत प्रफुल पटेल आणि रामदास आठवले. तर रणबीर कपूर व आलिया भट प्रथमच रंगमंचावर एकत्र येत आहेत, आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत ऋषी दर्डा. या कार्यक्रमात सेवाव्रती व कर्तबगार महाराष्ट्रीयनांचा गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा मंगळवार दि. 11 एप्रिल 2017 रोजी संध्याकाळी मुंबईत रंगणार असून त्याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लॉग ऑन करा www.facebook.com/lokmat