ऑनलाइन लोकमतअकोला, दि. १६ : पैशांसाठी बँकांसमोरील रांगांमध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांमध्ये सुविधा केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. या सुविधा केंद्रांद्वारे पतसंस्थांमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतील या केंद्राला बुधवारी प्रारंभ झाला.
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. हा निर्णय जाहीर करतानाच चलनी नोटा बदलून घेणे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजनादेखील करण्यात आल्या आहेत; परंतु कोणत्याही चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येतातच. त्यानुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना येणाऱ्या काही अडचणींची दखल घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये १५ दिवसांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, साहित्य व औषधी व इतर जीवनावश्यक वस्तू संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थांकडून खरेदी करून उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात ह्यसुविधा केंद्रह्ण स्थापन करण्याचे परिपत्रक काढण्यात आले असून, विविध विभाग प्रमुखांना पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सुविधा केंद्रांद्वारे पतसंस्थांमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ह्यना नफा ना तोटाह्ण या तत्त्वावर जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंचे देयक संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून धनादेशाद्वारे कपात करण्यात येणार आहे. या कामासाठी संबंधित विभाग प्रमुखांकडून तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे पैशांसाठी बँका व एटीएमसमोर लागणाऱ्या रांगांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी कमी होणार आहे.