- संतोष ठाकूरनवी दिल्ली : आगामी काळात नागपूर, पुणे, औरंगाबाद, बोरिवली आदी निवडक रेल्वे स्थानके विमानतळांप्रमाणे होणार आहेत. प्रवाशांना येण्याजाण्यासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे नसतील. सामानाच्या तपासणीसाठी प्रवाशांना रेल्वेगाडी यायच्या सुमारे तासभर आधी स्थानकावर यावे लागेल.रेल्वे स्थानकांत आग लागल्यास ते चार मिनिटांपेक्षा कमी वेळात रिकामे करण्यात येईल. इंडियन रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आयआरएसडीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. के. लोहिया यांनी सांगितले की, नागपूर रेल्वे स्थानकाचे विमानतळाप्रमाणे रुपडे पालटण्याचे काम येत्या पाच ते सहा महिन्यांत सुरू करण्याचा इरादा आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणुक एक महिन्यात करण्यात येईल. रेल्वे स्थानकांतील अशा बदलांसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातून निवडण्यात आलेल्या आराखड्यानुसार नागपूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे.देशातील रेल्वे स्थानकांमध्ये विमानतळाप्रमाणे बदल करण्यात येतील त्या कामाला ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल्वेच्या मूळ कार्याव्यतिरिक्त जी अन्य कामे आहेत ती खाजगी कंपन्यांकडून करून घेतली जातील. त्यात सफाई, जाहिरात, दुकाने चालविणे, प्रसाधनगृहांची निगा, पार्किंग या कामांचा समावेश आहे. रेल्वेगाड्या चालविणे, सुरक्षा ही कामे रेल्वेकडूनच पार पाडली जातील. रेल्वे स्थानकांचे अशा प्रकारे रुपडे पालटण्याचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अंधेरी, दादर, लोणावळा स्थानकांचाही समावेशअंधेरी, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल, लोणावळा, दादर, वर्धा, पुण्यानजिकचे शिवाजीनगर, अबू रोड आदी ४३ रेल्वे स्थानकांनाही विमानतळाप्रमाणे रुपडे व सोयी बहाल करण्यात येणार आहेत.
नागपूर, बोरिवली, पुणे रेल्वे स्थानकांत मिळणार विमानतळासारख्या सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 2:11 AM