ऑनलाइन लोकमत,
मुंबई, दि. 21 - मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधांचा वर्षाव करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सोमवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रसाधनगृह, लिफ्ट, पादचारी पूल यांचे उद्घाटन केले जाईल. महत्वाची बाब म्हणजे आठ स्थानकांवर वायफाय सेवेचेही उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पायाभूत सोयिसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. यात सरकते जिन्यांबरोबरच प्रसाधनगृह, सरकत्या जिन्यांसह अन्य सुविधांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत येऊन त्यांच्या उद्घाटनांचा धडाकाच लावला आहे. सोमवारीही रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते जवळपास १४ सुविधांचे उद्घाटन दादर येथील एका कार्यक्रमात करतानाच आठ सुविधांचे लोकार्पण करण्यात येईल. यात महत्वाच्या अशा वायफाय सुविधेचा समावेश असून कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर (मध्य रेल्वे), दादर (पश्चिम), वान्द्रे टर्मिनस, चर्चगेट,वान्द्रे (लोकल), खार रोड स्थानकात ही सुविधा सुरु केली जाईल. त्याचप्रमाणे दादर येथे गार्डन, सीएसटी येथे एसी विश्रामगृह, वॉटर रिसायकलिंग प्लान्ट आणि अपंग व्यक्तींसाठी बायो टॉयलेटही सुरु केले जात असून त्याचेही उद्घाटन होईल. सध्या काही स्थानकांवर टॉयलेटची कमतरता असून अशा स्थानकांवर नवे टॉयलेटही बनविण्यात आले आहे. कुर्ला व ठाणे येथे डिलक्स टॉयलेट, महालक्ष्मी येथे पे अॅण्ड युज टॉयलेट, खार रोड स्थानकात नम्मा टॉयलेट आणि कल्याण, गोवंडी स्थानकातही नव्या टॉयलेटचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. - नालासोपारा व गोरेगाव येथे तिकीट खिडक्यांबरोबरच बोरिवली येथे जी प्लस टू इमारत आणि नवीन तिकीट खिडक्याही सुरु केल्या जात आहे.
लोकार्पण करण्यात येणारे प्रकल्प-हार्बरवर बारा डबा प्रकल्प- हार्बरवर दोन नविन बारा डबाचे प्लॅटफॉर्म- अंधेरी येथे दोन लिफ्ट- गोरेगाव स्थानकात बुकींग आॅफीस- कर्जत, शहाड, कुर्ला, किंग्ज सर्कल, रे रोड, चेंबूर येथे पादचारी पुल- वसई रोड आणि नालासोपारा येथे पादचारी पुल व सरकते जिने.