धोंडिराम अर्जुन, सोलापूर देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपतीच्या बालाजीकडे पाहिले जाते. शिवाय शिर्डी साई देवस्थानही श्रीमंतीच्या यादीत आहे. या दोन्ही देवस्थानची बरोबरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती करू शकणार नाही, कारण गरिबांचा कनवाळू म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. देवस्थानचा निधी कमी असला तरी बालाजीच्या तोडीस तोड सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी व्यक्त केला. मंदिर समितीचा पदभार घेतल्यापासून डांगे यांनी वारकऱ्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, त्यांना ३१ आॅगस्टला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ‘लोकमत’शी त्यांनी साधलेला हा संवाद. लाखो वारकऱ्यांचा लोंढा वर्षातून चारदा येथे येतो. त्यामानाने इथे सुविधा नाहीत. बालाजी ंिकंवा साई देवस्थानने जागा विकत घेऊन विकास केला. पंढरीत जागेचा प्रश्न आहे. मात्र याच धर्तीवर पंढरीतही आम्ही जिथे मिळेल तिथे जागा विकत घेण्याचा मानस केला आहे. वारकऱ्यांची वाढणारी संख्या विचारात घेता येणाऱ्या काळात पाणी, वीज, रहिवास, रस्ते, शौचालये या सुविधा प्राधान्याने करण्यासाठी आराखडा तयार करणार आहे, असे त्यांनी सांगितले.सध्या वारकऱ्यांना मंदिर ते दर्शनबारी मांडव घातला आहे. शिवाय निवाऱ्यासाठी पत्राशेड, पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. वारीत वारकऱ्यांची मुख्य अडचण ही शौचालयाची आहे. कोर्टाच्या आदेशानुसार चार हजार शौचालये बांधण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी मंदिर समितीने ५० लाख रुपये दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ही शौचालये बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी क्षेत्र विकास प्राधिकरणातून २२ वारकरी संकुले सर्व्हे नं ५९ मध्ये मंजूर झाली आहेत. यात एका संकुलात ३०० संडास, ३०० बाथरुम आणि १० ते १५ लॉकरची सोय असेल. सध्या २२ संकुलांपैकी ६ संकुलांना जागा मिळाली आहे. याचा आराखडा तयार झाला असून टेंडर प्रक्रियाही पार पडली आहे. ३०० खोल्यांचे अत्याधुनिक ‘भक्तनिवास‘ साकारण्यात येणार आहे. याचे बांधकाम प्रगतिपथावर आहे, असे ते म्हणाले.
‘बालाजी’च्या धर्तीवर वारकऱ्यांना सुविधा देऊ
By admin | Published: July 07, 2014 3:34 AM