भंडारा, दि. 9 - राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची शिवसेनचे विदर्भ संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. परंतु शिवसैनिकांशी चर्चा करणार असल्याचा निरोप असल्यामुळे आम्ही आलो परंतु चर्चा न करता निघून जाण्याच्या कारणावरून शिवसैनिक संतप्त झाले. त्यामुळे पत्रकारपरिषद आटोपून नागपूरकडे निघताना शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागल्याचा प्रकार शनिवारला सायंकाळी विश्रामगृहात घडला. येणा-या २२ सप्टेंबरला पुन्हा भंडा-यात येणार असून सर्वांना संबोधित करणार असल्याचे आश्वासन देत शिवसैनिकांना शांत केले.
ना.दिवाकर रावते हे शनिवारला नियोजित दौ-यानुसार भंडारा जिल्ह्यात दुपारी २ वाजता येणार होते. पक्षबांधणीसाठी येणार असल्यामुळे एका मंगल कार्यालयात शिवसैनिकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचा संदेश आधीच पोहोचविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी दुपारपासून भंडा-यात उपस्थित झाले होते.
परंतु गोंदियाहून येण्यासाठी त्यांना ६ वाजले होते. त्यानंतर विमानाची वेळ होत असल्यामुळे त्यांनी पदाधिका-यांकडून स्वागत स्वीकारून आणि पत्रकारांशी चर्चा आटोपून ते नागपूरकडे निघाले. तिथून ते थेट वाहनात बसताच शिवसैनिकांनी नारेबाजी केली.
त्यानंतर ना.दिवाकर रावते यांनी वाहनाचे काच खाली केले. तितक्यात एका शिवसैनिक महिलेने ‘साहेब, जाण्यापूर्वी केवळ ‘जय महाराष्ट्र’ म्हटले असते तरी शिवसैनिकांचे समाधान झाले असते. असे म्हणताच ते वाहनातून खाली उतरले आणि कार्यकर्त्यांची समजूत काढत २२ सप्टेंबरला भंडा-यात येऊन सर्वांशी चर्चा करणार असल्याचे सांगून नागपूरकडे निघाले. परंतु कार्यकर्त्यांमधील असंतोष कमी झाला नव्हता. त्यांचा असंतोष नियोजन न केलेल्या स्थानिकांवर असल्याचे दिसून आले.