पुणे : बलात्काराचे गांभीर्य जातीवर ठरविले जाणार असेल आणि ज्या जातीच्या मुलीवर बलात्कार होईल त्यांच्याकडून मोर्चा काढला जात असेल तर हा समाज खरेच सुसंस्कृत आहे का, असा परखड सवाल माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी शुक्रवारी येथे केला.नागपूर येथील मारवाडी फाऊंडेशनतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व्यासपीठावर उपस्थित होते. महिला कोणत्याही जातीची असो तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नये. बलात्कार हा मानवी समाजाचा कलंक आहे, वेदना जर जातीवर अवलंबून ठरत असतील तर तो समाज संवेदनशील नाही. मराठा मुली जिजाऊंच्या मुली आहेत तर मग इतरांच्या मुली कोण? पाटणमध्ये (सातारा) झालेल्या मसापच्या साहित्य संमेलनातून कसबे आणि संमेलनाध्यक्ष प्रज्ञा दया पवार यांना हाकलून देण्यात आले; ही कुठली लोकशाही आहे? महाराष्ट्रात लोकांनी काही बोलायचे की नाही? शिवाजी महाराजांवर कुणाला काही बोलायचे असेल तर त्याने बोलायचे की नाही? असे सवालही त्यांनी केले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना घेऊन काम करणाऱ्या डॉ. कसबे यांनी जातीसोबतच वर्गसंघर्षाची बाजू देखील मांडली. मानवी समाजाच्या अज्ञानातून धर्माची उत्पत्ती झाली आहे, अशी धर्मचिकित्सादेखील केली असे सांगून प्रामाणिक विचार स्वातंत्र्यावर जेव्हा गदा येते तेव्हा फॅसिझम सुरू होतो, त्याआधीच आपण थांबायला हवे, असेही मुणगेकर यांनी सांगितले. डॉ. कसबे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गांधीजींना चुकीच्या पद्धतीने समोर आणले जात आहे. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जनचळवळ केली आणि फॅसिझमला रोखले. कारण फॅसिझम आला असता तर सामंतशाही टिकली असती. ब्राम्हणांचे श्रेष्ठत्व गेले म्हणूनच युती करून गांधींना बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात आहे.’’डॉ. कसबे यांनी साहित्यातून समाजाची शस्त्रक्रिया केली आहे, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा गौरव केला. (प्रतिनिधी)
खरेच हा समाज सुसंस्कृत आहे का - मुणगेकर
By admin | Published: October 15, 2016 3:31 AM