पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बहुसंख्य कारखान्यातील जे परप्रांतीय कंत्राटी कामगार मे महिन्यात कुटुंबासह गावी गेले ते अद्यापही न परतल्याने व स्थानिक कामगारही मोठया प्रमाणात लग्न व इतर कार्यक्रमात गुंतल्याने कामगारांअभावी या कारखान्यातील उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून उद्योजकांबरोबरच ठेकेदारही प्रचंड हवालदील झाले आहेत. तारापूर एम.आय.डी.सी. मध्ये स्टील, टेक्सस्टाईल, इंजिनियरिंग, रासायनिक, रेडीमेड गार्मेंट , फार्मास्युटिकल्स असे वेगवेगळया उत्पादनाचे सुमारे बाराशे लहान, मध्यम आणि मोठे कारखाने असून त्यात स्थानिकांपेक्षा उत्तरप्रदेश, बिहार, नेपाळ मधील कामगार मोठया प्रमाणात काम करीत आहेत. तारापूर एम आय डी सी मध्ये काम करणारे कंत्राटी व कायम स्वरूपी कामगारांबरोबरच प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात गावी गेले होते. ते अद्याप न परतल्याने बहुसंख्य उद्योगांमध्ये १५ ते ३० टक्क्यांपर्यंत मॅनपॉवरची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या उपलब्ध असलेल्यांकडूनच उत्पादन करून घेतले जात असले तरी निश्चित केलेल्या उत्पादनाचे उद्दीष्ट गाठणे अशक्य वाटत असल्याने वर्कआॅर्डर प्रमाणे उत्पादन करण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात आपले ग्राहक टिकवून ठेवणे उद्योजकांना जिकिरीचे जात आहे.कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारांकडे कामगारांसाठी उद्योजक तगादा लावत आहेत तर ठेकेदार पहाटेपासून ते रात्री पर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारखे कामगाराच्या शोधासाठी फिरत असल्याचे चित्र आहे. यामुळे नाका कामगारांकडे कधीही न फिरकणारे ठेकेदार आता त्यांची मनधरणी करून उद्योगांना लागणारी कामगारांची संख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.सध्या नाका कामगार ४०० रु पये प्रतिदिन मजूरी घेतात ते साधारणत: सकाळी ९ नंतर कामावर येतात व ५ वाजता परत जातात. त्यामुळे त्यांच्याकडून फारसे काम करवून घेता येत नाही.काम मिलेगा क्या? अशी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ऐकू येणारी कंत्राटी कामगाराची विनवणी सध्या नष्ट होऊन कारखान्यातील सुरक्षारक्षकच दिसेल त्याला कामावर या हो अशी विनवणी करतांना दिसतात. तर करखान्याच्या प्रवेशद्वारावरील नो व्हेकेन्सी या फलका ऐवजी कामगार चाहीये/भरती चालू असे फलक काही कारखान्याच्या प्रवेशद्वारावर दिसत आहेत.पूर्वी गावाला जाणारा कंत्राटी कामगार गावाहून परततांना तो त्याच्याबरोबर नात्यातील, मित्र परिवारातील आणखी चार - पाच जणांना घेऊन यायचा आता गावाला गेलेला कामगार पुन्हा परतेल याची शाश्वती तर नसतेच परंतु ठेकेदारांनी त्यांना आगाऊ दिलेले पैसेही बुडण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे ठेकेदार डोळ्यात तेल घालून गावाला गेलेल्या कामगारांची वाट पाहत असतात एवढा बदल परिस्थितीत झाला आहे. आपल्या कुटुंबासह मूळ गावी गेलेल्यांपैकी १५ ते २० टक्के कामगार परत येतच नाहीत असे जूने जाणते ठेकेदार त्यांच्या अनुभवा वरुन सांगतात तर आपल्या ठेकेदारीत काम करणारा कामगार एकदा गावी गेला की, पुन्हा केंव्हा परत येईल याचीही शाश्वती नसते परंतु वेळच्या वेळी पगार आणि खर्ची साठी पैसे देणारे वेळ प्रसंगी सर्व अडचणींना मदत करणाऱ्या ठेकेदारांकडे मात्र कामगार विश्वासाने राहताना दिसतात.सध्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा या ग्रामीण भागातील तसेच गुजरात राज्यातील गोध्रा भागातील अशिक्षित कामगार या हंगामात थोडया प्रमाणात तारापूरला येत असल्याने काहीसा दिलासा मिळत असला तरी उद्योगा मधील विविध विभागत काम करणारे आॅपरेटर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशीन आॅपरेटर, क्रेन आणि फोर्कलिफ्ट ड्रायव्हर, मेन्टेनेन्स, सुरक्षा रक्षक, तसेच प्रॉडक्शन, अकाउंट, क्यू. सी. डी., आर. अँड. डी., प्रयोगशाळा, सेफ्टी, टाईम आॅफीस, डिस्पैच, पैकिंग इत्यादि सर्व विभागातील प्रशिक्षित कामगारांचीही उणीव प्रकार्षाने जाणवत आहे. एरवी कंत्राटींना दुजाभावाने वागविणारे ठेकेदार व उद्योजक मे महिना व दिवाळी या दोन महिन्यात खूप गोडी गुलाबीने कामगारांशी वागतात. >स्थानिकांच्या अनुपस्थितीमुळेच मागणीत वाढस्थानिक कामगार आठ तासांची नोकरी व हलके काम करण्यास अधिक उत्सुक असतात ते छोटयाछोटया कारणांसाठीही अनुपस्थित राहतात विविध सोहळे, सण, उत्सवाच्या वेळी तर स्थानिक कामगारांचे अनुपस्थितिचे प्रमाण जास्त असल्यामुळे कंत्राटदारांची अधिक पसंती परप्रांतीय कामगारांना असते. परंतु आता बिहार सारख्या राज्यामध्ये नव्याने उप्लब्ध होत असलेले रोजगारांमुळे दिवसेंदिवस परप्रांतिय कामगार त्यांच्या राज्यात दोन पैसे कमीत कमी पण तेथेच काम शोधून तेथेच कुटुंबासह राहण्यास उत्सुक असतात. या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम येथील कंत्राटदार व उद्योगांवर होऊन भविष्यात येथील उद्योजकांनी बारा ऐवजी आठ तासाची कामाची वेळ व कायम कामगारांप्रमाणे सोयी सुविधा न दिल्यास भविष्यात कामगारांची टंचाई भासणार आहे.सध्याच्या घडीला कंत्राटी कामगारांसह प्रशिक्षित कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत असून जूनच्या १५ ते २० तारखेपर्यंत हे सर्व कर्मचारी परततील, असा अंदाज आहे. तोपर्यंत उद्योजकांबरोबरच ठेकेदारांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे महत्त्व वाढले आहे.
कामगार न परतल्याने कारखान्यांना फटका
By admin | Published: June 09, 2017 2:56 AM