मुंबई : राज्यात उद्योगांना महागडी वीज विकत घ्यावी लागते आहे. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या शेजारच्या राज्यात ३० ते ४० टक्के कमी दरात मिळत असल्याने राज्यातील वीज उद्योगांना परवडेनासा झाली आहे. सीमावर्ती भागात तर कारखाना शेजारच्या राज्यात आणि उद्योजक महाराष्ट्रात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता एमआयडीसीच वीज वितरणाचा परवाना घेणार असून त्या माध्यमातून कमी दरात उद्योगांना वीज देण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यात औद्योगिक विजेचा दर ९ तर १० रूपये प्रति युनिट आहे. तर शेजारच्या राज्यात हाच दर ६ ते ७ रूपये आहे. कमी दरात वीज उपलब्ध असताना महाराष्ट्राची वीज महाग का, याचे समाधानकारक उत्तरच आपल्याला उद्योगांना देता येत नाही. शेतीला एक रूपया दराने वीज दिली जाते. शेती क्षेत्र महत्वाचे आहे. ये वाचायला हवे. पण या क्षेत्राला वाचवताना त्याचा सारा भार इतर दुस-या क्षेत्रावर टाकला जात आहे. दहा हजार कोटींचा बोजा उद्योगांना चढ्या दराने वीज विक्री करून उतरवला जात आहे. त्याचा दुष्परिणाम उद्योगधंद्यांवर होत असल्याचे उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले.
या समस्येवर मात करण्यासाठी एमआयडीसीच आता वीज वितरणाचा परवाना घेणार आहे. त्यामुळे देशात कमी दरात उपलब्ध असलेली वीज योग्य दरात उद्योगांना दिली जाईल. त्यामुळे सर्व आमदारांनी या धोरणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही उद्योग मंत्री देसाई यांनी केले.