लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वांत चांगले मुख्यमंत्री असल्याचे प्रशस्तिपत्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी संधी दिल्यामुळेच सगळ्यात चांगल्या मुख्यमंत्र्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याची भावना देखील देसाई यांनी बोलून दाखविली. सुभाष देसाई यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित त्यांच्यावरील ‘सुभाष देसाई’ या पुस्तकाचे प्रकाशन गोरेगाव (पूर्व) येथील एनसीसी संकुलात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज उपस्थित होते.या वेळी मनोगतात सुभाष देसाई म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला तेच प्रेम मला उद्धव ठाकरे यांनी दिले. बाळासाहेब ठाकरे नावाच्या महापुरुषाचे दर्शन झाल्यानंतरच मी उजेडात आलो. बाळासाहेबांनी पुढे येण्याची संधी दिली. त्यांनी मला १९८४ साली शिवसेना नेता बनविले. कोणत्याही सभागृृहाचा सभासद नसताना, उद्धव ठाकरे यांनी मला विधान परिषदेत पाठवून मंत्री होण्याची संधी दिली. ही संधी मिळाली नसती, तर आज या मंत्रिपदाची शान नसती. पक्षाने मला सर्व काही दिले, आमदार, मंत्री केले, अशी कृतज्ञ भावना या वेळी देसाई यांनी व्यक्त केली. या वेळी मंचावर विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, देसाई यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश बापट, गिरीश महाजन, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, पांडुरंग फुंडकर तसेच राज्यमंत्री रवींद्र वायकर, दादासाहेब भुसे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना नेते लीलाधर डाके, जर्मनीचे कौन्सिलेट जनरल डॉ. मुराहर, युगांडाचे कौन्सिलेट जनरल मधुसूदन अगरवाल, रश्मी ठाकरे, सुषमा सुभाष देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले. खासदार अरविंद सावंत, आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष होते.
फडणवीस आतापर्यंतचे सर्वांत चांगले मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:58 AM