नागपूर: विधानसभा निवडणुकीच्याआधी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..' हे भाषण चांगलेच गाजले होते. तर सोशल मिडीयावर सुद्धा ही क्लिप मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाली होती. मात्र भाजपचं सरकार सत्तेत न आल्याने देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची विरोधी पक्षातील नेत्यांसह अनेकांनी खिल्ली उडवली होती. परंतु आज नागपूरमध्ये भाजपकडून ' तुम्ही पुन्हा येणार..पुन्हा येणार' अशी बॅनर्स लावण्यात आले आहे.
नागपुरात हिवाळे अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर भाजपकडून नागपुरातील लॉ कॉलेजकडून विधानभवनकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक बस स्टॉपवर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ 'तुम्ही पुन्हा येणार.. पुन्हा येणार'चे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अनके ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या फोटोसह 'तुम्ही पुन्हा येणार' असं लिहिलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत. आमचा तुमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. 'तुम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार, ' असं या बॅनर्सवर लिहिण्यात आलं आहे. नागपूरच्या नेत्यांच्या फोटोंसह लागलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेत त्यांनी 'मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन' अशी घोषणा दिली होती. त्यानंतर सुद्धा त्यांनी याचा उल्लेख आपल्या भाषणातून व पत्रकार परिषदमधून केला होता. मात्र शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होता आले नाही. त्यामुळे विरोधकांनी या वक्तव्यवरून त्यांची खिल्ली उडवली होती.