मुंबई : राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे आरोप सतत भाजपकडून करण्यात येत आहे. तर याच मुद्यावरून राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचा समाचार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांचे सर्वचं अंदाज चुकतायत त्यामुळे त्यांनी चांगला ज्योतिषी शोधावा अशी बोचरी टीका थोरात यांनी केली आहे.
थोरात हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या जागा सुद्धा विरोधकांना मिळणार नसल्याचा दावा केला होता.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले होते. पण त्यांची सर्व भाकिते खोटी ठरली असल्याचे थोरात म्हणाले. तर फडणवीस यांच्या या वक्तव्याची थोरात यांनी खिल्ली उडवत, फडणवीसांनी आता कुठलेही भाकित करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगवाला.
तर नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असेही यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.