औरंगाबाद, दि. 17 : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल. मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेह-यांना संधी मिळणार काय? यावर त्यांनी स्मितहास्य करीत विस्तार होणार हे नक्की असल्याचे सांगितले, परंतु विस्तार केव्हा होणार, मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात केव्हा घेणार याची तारीख मात्र सांगितली नाही.
प्रत्येक मंत्र्याचा 'केआरए' पाहून, कामगिरीची शहानिशा करूनच मुख्यमंत्री बढती-बदली-पदावनतीबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतं आहे. त्याची सुरूवात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना एक प्रश्नावली पाठवली आहे. व त्यावर उत्तरं मागविली आहेत. मंत्र्यांनी पाठविलेली उत्तरं तपासून नवरात्रीनंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करू शकतात, असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबरला देवेंद्र सरकारला तीन वर्षं पूर्ण होत आहेत. त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठीही या कार्य अहवालाचा उपयोग होऊ शकतो.
गेल्या आठवड्यात माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. या अहवालात 122 पैकी 39 आमदारांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे समोर आले. याशिवाय 23 पैकी 11 खासदारांनादेखील चांगले काम करण्यात अपयश आल्याचे अहवालातून समोर आलं आहे. जवळपास निम्म्या खासदारांची कामगिरीदेखील फारशी समाधानकारक नसल्याची आकडेवारी भाजपाच्या सर्वेक्षणातून पुढे आली असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला आहे. कामगिरी सुधारा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचं ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटलं होत.
तीन वर्षांच्या कालावधीत मंत्री म्हणून काय विशेष काम केलं? गेल्या सरकारच्या तुलनेत तुम्ही केलेलं काम श्रेष्ठ कसं ठरतं? तुमच्या कामामुळे जनतेच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला? ही संपूर्ण माहिती तुलनात्मक आकडेवारीसोबत द्या. अपूर्ण आणि चुकीची माहिती स्वीकार केली जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही आणि तुम्ही काहीही काम केलेलं नाही, असं मानण्यात येईल, असे काहीसे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना विचारल्याचं समजतं आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री औरंगाबादेत आले होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर ते सहकारनगर येथील एका दालनाच्या उद्घाटनासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले. मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विस्तार होणार काय असा प्रश्न केला असता त्यांनी हो म्हणून उत्तर दिले. तर मराठवाड्या मंत्रिमंडळाची बैठक यंदा घेण्यात येईल काय, यावरही त्यांनी हो म्हणून उत्तर दिले. लोडशेडिंगच्या प्रश्नावर त्यांनी ठोस असे उत्तर दिले नाही.