ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१- राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विकास आराखडय़ातील सर्व योजना माझ्या ब्ल्यू प्रिंटमधीलच आहेत. याबद्दल कुणी शाबासकी देत नाहीत. ब्ल्यू प्रिंट येण्यापूर्वी कुठे आहे ती? असे विचारणारे आता याबद्दल कुणी काहीच विचारत नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.
विविध खटल्यांमध्ये निलंगा, परांडा येथील न्यायालयात हजर राहण्यासाठी ठाकरे येथे मुक्कामाला आले आहेत. गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने त्यांनी मराठवाडय़ातील दुष्काळी भागांची पाहणी केली. मनसेच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये दुष्काळावर कोणत्या उपाययोजना सांगितल्या आहेत, असे विचारले असता, लवकरच आपण औरंगाबाद येथे पाणी या विषयावर कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेणार आहोत. यामध्ये प्रश्न आणि उपाययोजनांवर ब्ल्यू प्रिंटच्या अनुषंगाने चर्चा करू, कार्यकर्त्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ब्ल्यू प्रिंट येण्याआधी माध्यमांकडून ती कधी येणार म्हणून सारखे विचारले जायचे; पण आता ती आली आहे; पण कुणी विचारत नाही. फडणवीस सरकार ब्ल्यू प्रिंटमधील योजनाच राबवत आहे; पण साधी शाबासकीही नाही. या सरकारने 33 हजार विहिरी बांधल्याचा दावा केला; पण त्या कुठे आहेत. एक तरी विहीर दाखवा. एकावर एक विहिरी बांधल्या का? विहिरींचा टॉवर उभा केला आहे का? असे प्रश्न त्यांनी आपल्या खास शैलीत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
काँग्रेस आघाडी सरकारपेक्षा भाजप - शिवसेना सरकार काही वेगळे नाही. लातूरमध्ये रेल्वेने पाणी पुरवठा केला जातोय. हा काही दुष्काळावर उपाय आहे का? दुष्काळाचा संदर्भ घेऊन फडणीस सरकारचे मंत्री आघाडी सरकारवर टीका करतात; पण आता तुम्हालाही येऊन दीड वर्षे झाली उगीच लोकांची उणीधुणी का काढता, अशीही त्यांनी खडसावून टीका केली. भाजपकडे तर माणसेच नाहीत. भाडय़ाने माणसे आणून त्यांना ते लढवितात, अशी टीका त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे उपस्थित होते.
विदर्भाचा मुद्दा लक्ष वळविण्यासाठी
जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठ वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला जातोय. विदर्भातील किती लोकांना आपण वेगळं व्हावं वाटते, हे जाणून घ्या. आता वेगळ्या मराठवाडय़ाची टूम निघाली आहे. श्रीहरी अणे मुंबईत राहतात. समुद्रकिनारी त्यांचे घर आहे आणि विदर्भ, मराठवाडय़ाचा मुद्दा उपस्थित करतायेत. त्यांच्या वकिली ज्ञानाबद्दल शंका नाही; पण ते निरर्थक प्रश्न उपस्थित करीत आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
व्यंगचित्रांना वेळ मिळत नाही
व्यंगचित्रे काढायची आहेत; पण सध्या वेळ मिळत नाही, असे सांगून ठाकरे यांनी वर्तमानपत्र काढण्याचा विचार व्यक्त केला. सरकारची आणि त्यांच्या माणसाची भूमिका मला पटत नाही. त्यामुळे मी वर्तमानपत्र काढू शकते, असेही ते म्हणाले.