यदु जोशी, मुंबईशिवसेनेने पाठिंबा काढला तरी आपले सरकार पडणार नाही, असे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाच वर्षे धोका नाही, असा विश्वास व्यक्त केलेला असतानाच भाजपाने ‘प्लॅन-बी’ तयार ठेवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शिवसेनेचे १२ मंत्री आहेत आणि ४ मंत्रिपदे रिक्त आहेत. म्हणजे १६ जणांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. रिक्त मंत्रिपदे हे सत्तेचे स्थैर्य मिळविण्यासाठी भाजपाकडील सर्वांत मोठे आयुध असेल, असे मानले जाते. याशिवाय, शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारचाही पाठिंबा काढल्यास केंद्रातील महाराष्ट्राच्या कोट्याचे एक कॅबिनेट मंत्रिपद रिक्त होणार आहे. भाजपाचे १२२ आमदार आहेत आणि अन्य ९ आमदारांचा पाठिंबा भाजपाने तयार ठेवला आहे. असे १३१ आमदार आत्ताच भाजपासोबत आहेत. आणखी लहान पक्ष आणि अपक्ष असे चार ते पाच आमदार भाजपा आपल्यासोबत आणेल. म्हणजे एकूण संख्याबळ १३६पर्यंत सहज जाऊ शकेल आणि त्यानंतर सरकार वाचविण्यासाठी केवळ नऊ आमदारांची गरज भासणार आहे. नऊ आमदारांना फोडून पुन्हा निवडून आणणे हा एक पर्याय आहे. सरकार अल्पमतात आले तर कायद्याप्रमाणे राज्यपाल हे सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपालाच आमंत्रित करतील. बहुमत सिद्ध करायला भाजपाला निश्चित असा अवधीदेखील मिळेल. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाची काय परिस्थिती होते हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. सूत्रांनी सांगितले की, अशा पार्श्वभूमीवर, शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढूनही सरकार पडणार नसेल तर पाठिंबा का काढायचा, असा एक मतप्रवाह शिवसेनेतदेखील आहे. ‘शिवसेनेने सरकार पाडून दाखविले’ असे होणारच नसेल तर पाठिंबा कायम ठेवणे योग्य असे काहींना वाटते.फडणवीस सरकार हे १२२ आमदारांच्या भरवश्यावरच बनले होते. त्यांनी विश्वासमत सिद्ध केले तेव्हाही शिवसेना त्यांच्यासोबत नव्हती. ३१ आॅक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला. नोव्हेंबरमध्ये तीन दिवसांचे विशेष अधिवेशन झाले आणि त्यात सरकारला बहुमत सिद्ध करायचे होते. शिवसेना तेव्हा विरोधी पक्षात होती. त्यांचा सरकारला पाठिंबा नव्हता. शिवसेनेने त्या दिवशी सभागृहात मतदानाची मागणी केली. ती अध्यक्षांनी अमान्य केली. आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला होता. त्याची पुनरावृत्ती पुढेही होऊ शकते, असे सूचक उद्गार एका भाजपा मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना काढले.शिवसेना पाठिंबा काढेल की नाही याबाबत मला माहिती नाही. पण माझ्या सरकारला पाच वर्षे कोणताही धोका नाही. मी निश्चिंत आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
शिवसेनेने पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकारला धोका नाही
By admin | Published: February 11, 2017 4:58 AM