नागपूर : गेल्या १५ वर्षांपासूनची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील सत्ता भाजपाच्या वादळात वाहून गेली. भाजपा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. नागपुरातील विधानसभेच्या १२ जागांपैकी ११ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि नागपुरातील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार सुनील केदार यांनी विजयाचा चौकार मारला. कामठीतून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील या निवडणुका लढण्यात आल्या. संपूर्ण राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. स्वत: फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपुरातून तब्बल ५८९४३ मतांनी विजय प्राप्त केला. ही त्यांची चौथी विधानसभा निवडणूक होती. फडणवीस यांनी सर्वप्रथम १९९९ मध्ये पश्चिम नागपूर मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक धवड यांचा ९०८७ मतांनी पराभव केला होता. तेव्हा त्यांना ९४,८५३ मते मिळाली हेती तर काँग्रेसच्या उमेदवाराला ८५,६७७ मते मिळाली होती. २००४ मध्ये पक्षाने पुन्हा त्यांना पश्चिम नागपुरातून संधी दिली. त्या निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार रणजित देशमुख यांचा त्यांनी १७ हजार ६१० मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीमध्ये फडणवीस यांना १ लाख १३ हजार १४३ मते मिळाली होती तर रणजित देशमुख यांना ९५५३३ मते मिळाली होती. २००९ च्या निवडणुकीमध्ये दक्षिण-पश्चिम हा नवीन मतदार संघ झाला. येथून फडणवीस यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. या निवडणुकीत पुन्हा त्यांनी विजय प्राप्त करीत विजयाचा चौकार मारला. सावनेरमधील काँग्रेसचे उमेदवार सुनील केदार हे सावनेरमधून १९९५ मध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. काँग्रेसचे दिग्गज उमेदवार रणजित देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर १९९९ ची निवडणूक वगळता ते सलग निवडून येत आहेत. कामठी विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी २००४ मध्ये कामठीतून विधानसभेची पहिल्यांदा निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत त्यांनी सुलेखा कुंभारे यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुनीता गावंडे यांचा पराभव केला होता. (प्रतिनिधी)
फडणवीस, केदारांचा चौकार - बावनकुळेंची हॅट्ट्रिक
By admin | Published: October 20, 2014 12:40 AM