मुंबई - राज्यातील सर्वात सक्षम नेता म्हणूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्रातील जनतेनं कौल दिला आहे. राज्यातील जनतेनं सक्षम नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पहिली पसंती दिली आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव आहे. एबीपीच्या ऑक्टोबर महिन्यातील सर्वेक्षणानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीने ऑक्टोबर महिन्यात सर्व्हे करुन मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. त्यानुसार, राज्यात सेना-भाजपा एकत्र लढल्यास महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीला 34 जागा मिळतील. तर काँग्रेस आघाडीला 14 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तसेच राज्यातील सक्षम नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना तर देशातील सक्षम नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती आहे. त्यामुळेच एबीपीच्या सर्व्हेनुसार आजही महाराष्ट्राचा मूड 'केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' असेच सांगत आहे.
एबीपीच्या सर्वेक्षणामध्ये फडणवीस यांना 19.3 टक्के मतदारांनी पाठींबा दर्शवत सक्षम नेता म्हणून पहिली पसंती दिली आहे. तर शरद पवार यांना 18.7 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाचवा क्रमांक लागतो. त्याच्या अगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील 11.8 टक्के नागरिकांनी तिसरा क्रमांक देत सक्षम नेता मानले आहे. नितीन गडकरी हे 11 टक्के मतांसह चौथ्या क्रमांकाचे सक्षम नेते आहेत. तर माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना 5.1 टक्के नागरिकांनी मते देत सातव्या क्रमांकावर ढकलले आहे. या यादीत अजित पवारांच्या अगोदर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नंबर लागतो. अशोक चव्हाण यांना 7.5 टक्के मते मिळाली असून त्यांचा सक्षम नेता म्हणून सहावा क्रमांक आहे.