ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - मोदींना आव्हान देण्याआधी फडणवीसांचा सामना करा, असे आव्हान देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रतिआव्हान दिले आहेत. आव्हानाची भाषा करताय, फडणवीस तुम्ही आणि मोदी दोघेही या, सगळे मिळून या, एकदाच काय ते निपटून टाकू, असा टोला उद्धव ठाकरेंनी आज रात्री घाटकोपर येथे झालेल्या शिवसेनेच्या प्रचारसभेत लगावला.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान काल मुंबईत प्रचारसभा घेण्यावरून थेट मोदींना आव्हान देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांनी आज किरिट सोमय्या यांच्या मतदारसंघातील प्रचारसभेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे वचन स्टॅम्पपेपरवर लिहून देत जाहीरनामा प्रकाशित करणाऱ्या भाजपावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीका केली. ते म्हणाले, "भाजपाने वचननाम्याला स्टँम्पपेपर जोडून दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. पण या स्टॅम्पपेपरऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का वापरला नाही, शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचा फोटो वचननाम्यात वापरलाय. हा फोटो आश्वासकतेची हमी देतो. पण भाजपाचे तसे नाही. मोदींचा फोटो म्हणजे तेलगीच्या स्टॅम्पपेपरसारखा आहे,"
हार्दिक पटेल भेटायला आल्याने अनेकांची चिंता वाढली, पण हार्दिक पटेल युती करण्यासाठी आला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. तसेच राज्यात वाळू माफिया माजले असताना मुंबईत माफिया राज आहे असा आरोप कसा काय करता, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.