मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 15 दिवस उलटून गेले आहे. मात्र शिवसेना-भाजप यांच्यातील सत्तास्थापनेची ओढतान अजुनही कायम आहे. शिवसेना-भाजप सत्ता लवकरच सत्ता स्थापन करणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. भाजप नेत्यांना देखील सत्तेत बसण्याचे स्वप्न पडत होते. परंतु, शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे अद्याप राज्याला नवीन सरकार मिळू शकलेले नाही.
शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध सुधारून सत्तास्थापनेसाठी भाजप नेत्यांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आघाडीवर होते. त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. तसेच बाहेर आल्यानंतर लवकरच शिवसेना-भाजपमधून गोड बातमी मिळेल असा विश्वास व्यक्त केली होती. परंतु, अद्याप तस झालं नाही.
शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. तर भाजपने अशी बोलणीच झाली नसल्याचा दावा केला आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. त्यामुळे युतीचे संबंध सुधारण्याऐवजी आणखीच बिघडल्याचे चित्र आहे.
दरम्यान सभागृहाची मुदत संपल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा आला मात्र मुनगंटीवार यांनी उल्लेख केलेल्या गोड बातमीचं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.