मुंबई - विधानसभा निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला मतदारांनी बहुमत न दिल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शिवसेना-भाजप युतीत लढल्यामुळे सरकार स्थापन करण्यात अशी शक्यता होती. मात्र मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने राष्ट्रवीदी- काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार लवकरच कोसळणार भविष्यवाणी भाजप नेत्यांकडून नेहमीच करण्यात येते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी असंच वक्तव्य केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
भाजपला दूर ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील, अशी धारणा भाजप नेत्यांची आहे. फडणवीस यांच्याकडे सध्या विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचवेळी त्यांच्या नावाचे मागे माजी मुख्यमंत्री हे बिरुद लागले. मात्र 'माजी मुख्यमंत्रीपद' हे बिरुद फडणवीसांच्या नावामागे फार काळ राहणार नाही. हे पद त्यांच्या आयुष्यात अल्पकाळ राहिल, असं भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते, असा अंदाज भाजपच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत व्यक्त केला आहे. तसेच सरकार कोसळले की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असंही सांगण्यात येते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक जोशी यांनीच ही शक्यता वर्तविल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंच्या मोदी भेटीची चर्चामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर उद्धव यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन केले. मात्र त्यांची ही भेट आणि कायद्याला दिलेले समर्थन चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना पुन्हा भाजपच्या जवळ तर जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.