- पंकज रोडेकर, ठाणे नाट्यसंमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी उपस्थित राहणार असून राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून त्यांची जिल्ह्यातील ती दहावी वारी असेल. वर्षभरात वरचेवर ठाण्याला भेटी देणारे फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील वर्षाच्या प्रारंभी ठाणे, उल्हासनगर महापालिकांच्या निवडणुका असल्याने फडणवीस वरचेवर पायधूळ झाडत असल्याची चर्चा ठाण्यात सुरू आहे.आगामी महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून शिवसेनेने ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या दिमाखदार आयोजनात पुढाकार घेतला. सांस्कृतिक क्षेत्रातील या पुढाकाराचा शिवसेनेला नेहमीच लाभ होत राहिला असताना संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहून नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट व अन्य मंडळींकरिता कोणत्या घोषणा करणार, याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या तर त्याचा लाभ भाजपाला होईल. जिल्ह्यात भाजपाला उभारणी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घेतल्याचे बोलले जाते. त्यांनी जिल्ह्यात एकूण नऊ कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. यामध्ये ठाण्याला ५, कल्याण २, भिवंडी व नवी मुंबईत प्रत्येकी एक कार्यक्रम आहे. नाट्यसंमेलनाच्या समारोपाला दहाव्या वेळी ते उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलवून शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले, तर आता समारोपाला फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे भाजपाला शक्तिप्रदर्शनाची संधी लाभली आहे.
फडणवीसांची आज जिल्ह्यात दहावी वारी
By admin | Published: February 21, 2016 2:45 AM