मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविले जाण्याची कुठलीही शक्यता नाही. ते राज्यातच राहतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. पत्रपरिषदेत ते म्हणाले की, फडणवीस यांचे सरकार स्थिर आहे. राज्याच्या प्रगतीसाठी ते झपाट्याने निर्णय घेत आहेत. अलीकडे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपाला फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगले यशही मिळाले असून, त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे, असे कौतुक गडकरी यांनी केले. गोव्यामध्ये काँग्रेस पक्षात आणखी फूट पडेल, असे स्पष्ट संकेत गडकरी यांनी दिले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पुत्र आमदार विश्वजीत राणे यांनी आज आमदारकी आणि काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. हे तर ट्रेलर आहे अजून सिनेमा बाकी आहे. काय काय होते ते बघा, असे सूचक उद्गार गडकरी यांनी पत्रपरिषदेत काढले. गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन करण्यात गडकरी यांची महत्त्वाची भूमिका होती. हे सरकार जनभावना पायदळी तुडवून स्थापन झाल्याची टीका काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही केली आहे. याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले की, गोव्यात आम्हाला सर्वाधिक ३१ टक्के मते मिळाली. काँग्रेसला २६ टक्के मते होती. याचा अर्थ जनभावना जास्त भाजपासोबतच होती. राजकारणात संधी महत्त्वाची असते. वेगवान हालचाली करून आम्ही सत्तेसाठीचे आवश्यक संख्याबळ मिळविले. काँग्रेसला ते करता आले नाही. आम्ही त्या ठिकाणी पाच वर्षे स्थिर सरकार देऊ. स्वत:चे आमदारही सांभाळू न शकलेली काँग्रेस आता निराशेपोटी आमच्यावर आरोप करीत आहे. लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे; पण शिवसेनेच्या उमेदवारांना सर्व मिळून गोव्यात ७५० मते मिळाली, असा चिमटा गडकरींनी काढला. (विशेष प्रतिनिधी)
फडणवीस राज्यातच राहणार
By admin | Published: March 17, 2017 1:08 AM