परभणी - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी एक स्क्रिप्ट तयार केली होती आणि त्या स्क्रिप्टवरून महाविकास आघाडी सरकारला घाबरविण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांचा पेनड्राइव्ह फुसका बॉम्ब आहे, अशी प्रतिक्रया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
परभणी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्ती वितरण कार्यक्रमास शनिवारी पटोले परभणीत आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी एक स्क्रिप्ट तयार केली आणि त्यावरून महाविकास आघाडी सरकारला घाबरविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांचा पेनड्राइव्ह फुसका बॉम्ब असून, याबाबतचे उत्तर त्यांना उद्या सभागृहात भेटणार आहे.
खरं तर फडणवीसांना भीती आहे, कारण रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून फडणवीस यांनी अनेकांचे फोन टॅप केले होते, त्यात भाजप नेत्यांचेही फोन टॅप केले होते. त्यामुळे आता कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे, असेही पटोले म्हणाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे उपस्थित होते.