आॅनलाइन लोकमत : नाशिक /
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पुरेशी गर्दी जमलेली नाही. गर्दी जमविण्यासाठी नेत्यांची धावपळ होत असून आमदारांना धडकी भरली आहेत. फडणवीस यांनी पदाधिकाऱ्याच्या घरी नाश्ता घेऊन अर्धा तास उलटला असला तरी अद्याप फडणवीस कान्हेरे मैदानाच्या दिशेने रवाना झालेले नाही. यामुळे सूर्यास्तानंतरच सभा सुरू होण्याची चिन्हे आहेत. कार्यकर्ते गर्दी आणायची कशी व कोठून यासाठी आटापिटा करत आहेत. शहरात सर्वत्र भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचार वाहनांवरून ‘कान्हेरे मैदानाच्या दिशेने चला... मुख्यमंत्री फडणवीस सभेला पोहचले आहेत...’ असे आवाहन करण्यात येत आहेत. पुण्याच्या सदाशिव पेठेप्रमाणेच नाशिकच्या कान्हेरे मैदानावरील सभेसाठी फडणवीस यांना नागरिकांच्या गर्दीची प्रतीक्षा करावी लागत आहे. सभेच्या ठिकाणी लोकांपेक्षा पोलीस, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीच अधिक गर्दी जमली आहे. साडेचार वाजेची नियोजित वेळ सभेसाठी देण्यात आली होती तब्बल दीड तास अधिक होऊनदेखील सभेला नागरिक जमलेले नसल्याने फडणवीस यांना ‘वेट अॅन्ड वॉच’ करावे लागत आहे.