मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. कोण किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही परंतु काही जागांवर इतर मित्रपक्ष मागणी करायला लागलेत. मुंबईतील अणुशक्तीनगर इथं विद्यमान आमदार नवाब मलिक आहेत जे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. ही जागा महायुतीत अजित पवारांच्या वाट्याला जाईल बोललं जाते. मात्र याचठिकाणी समाजवादी पक्ष जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे.
माहितीनुसार, अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहद अहमद या मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. समाजवादी पक्षाकडून फहद अहमद यांना निवडणुकीचं तिकीट मिळू शकते. त्यासाठी समाजवादीने महाविकास आघाडीकडे अणुशक्तीनगर जागेची मागणी केली आहे. २००८ साली या मतदारसंघाची निर्मिती झाली. २००९ च्या निवडणुकीत नवाब मलिक या मतदारसंघात विजयी झाले. त्यानंतर २०१४ साली शिवसेनेच्या तुकाराम काटेंनी त्यांचा पराभव केला. परंतु पुन्हा २०१९ साली हा मतदारसंघ मलिकांनी स्वत:कडे खेचून आणला.
कोण आहे फहद अहमद?
फहद अहमद हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत. सध्या ते समाजवादीच्या युवा आघाडीचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतात. फहद अहमद यांनी २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी ते विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत होते. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांवर रॅली, आंदोलनात ते सक्रीय सहभाग घेत होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी केलेले फहद अहमद यांचे आंदोलन चांगलेच गाजले होते. सीएए कायद्याविरोधात रॅलीमध्येही ते पुढे होते. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी फहद अहमद यांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करसोबत लग्न केले.
नवाब मलिकांचा पत्ता कट?
२०२४ च्या निवडणुकीत नवाब मलिकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग आरोप आणि भाजपाचा विरोध यामुळे या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मलिकांच्या मुलीला उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री होते. मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांना अटक करण्यात आली होती. अनेक महिने ते जेलमध्ये होते. त्यानंतर आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जेलमधून जामीन मिळाला. ते सध्या महायुतीत अजित पवारांसोबत आहेत. मात्र ते निवडणूक लढतील की नाही हे चित्र स्पष्ट नाही.