मुंबई - दहावी आणि बारावीची परीक्षा तरुण-तरुणींच्या आयुष्याला वळण देणारा मोठा टप्पा असल्याने या परीक्षेत नापास झाल्यास भविष्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी मागील सरकारच्या काळात अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. सरकारने याबाबत परिपत्रक काढून यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करुन देण्याची तसेच या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण शेरा न देता कौशल्य विकासास पात्र असा शेरा देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिले आहेत.
या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारने कौशल्य सेतू कार्यक्रम योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करुन स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करणे. प्रशिक्षण झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना रोजगार-स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे असा कार्यक्रम आखून देण्यात आला आहे.
या नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याकरिता संगणीकृत पोर्टलवर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: नोंदणी करणे आवश्यक असून या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र आणि अनुत्तीर्ण असलेली गुणपत्रिका जोडणे गरजेचे आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची वर्गातील किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यास संबंधित उमेदवारास मूल्यमापन करण्याकरिता पात्र ठरविले जाणार आहे.
दरम्यान, दहावीमध्ये अवघड वाटणाऱ्या विषयांशिवाय यापुढे परीक्षा देता येणार आहे. गणित, विज्ञान, इंग्रजीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते. या विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या या विषयांशिवाय आता परीक्षा देता येणार आहे. जानेवारी २०२० पासून मुक्त विद्यालयाचे दहावीचे वर्ग सुरु होणार आहेत. आठवी उत्तीर्ण किंवा वयाची पंधरा वर्षे पूर्ण असणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला दहावीचा प्रवेश मिळणार आहे. मुक्त विद्यालयाचा अभ्यासक्रम दहावी बोर्डाप्रमाणेच असणार आहे. दोन भाषा विषयांसह कोणतेही तीन अशा एकूण पाच विषयांची निवड विद्यार्थ्यांना करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण २१ व राष्ट्रीय कौशल्य विकास अभ्यासक्रमातील एकूण १४ विषयांमधून हे विषय निवडता येणार आहेत. नोंदणी केल्यानंतर पाच वर्षापर्यंत परीक्षा देण्याची सवलत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सोयीनुसार कोणत्याही एका विषयाची परीक्षा देता येणार आहे.
असं असेल मुक्त विद्यालयमुक्त विद्यापीठाप्रमाणेच मुक्त विद्यालयाची केंद्र नियुक्त केली जातील. या केंद्रात प्रवेश घेणाऱ्यांना शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. या केंद्रांवर त्या मुलांना त्यांनी निवडलेल्या विषयानुसार शिकवण्या दिल्या जातील. ही केंद्रे सरकारमान्य असल्यामुळे तेथून दहावी उत्तीर्ण होणाऱ्यांनाही नियमित शाळेच्या प्रमाणपत्राच्या दर्जासारखेच प्रमाणपत्र मिळेल.