केंद्र सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची, सांगण्याची जबाबदारी राज्यातील नेत्यांवर देण्यात आली आहे. यासाठी हे नेते प्रचारामध्ये मोदींच्या योजना सांगत आहेत. अशातच राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी अजब विधान केले आहे.
धुळ्यातील शिरपूरमध्ये गावित यांनी नमो संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मोदींच्या जनतेसाठीच्या योजना पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी पाठविलेल्या योजना आम्ही पोहोचवण्यात कमी पडलो. आम्ही या योजना पोहोचवू शकलो असतो तर खूप मोठे काम झाले असते, असे वक्तव्य गावित यांनी केले. या योजना पोहोचल्या असत्या तर अशा बैठका घेत लाभार्थ्यांकडे जा हे करा ते करा करण्याची वेळच आली नसती, अशी देखील कबुली गावितांनी दिली आहे.
शिरपूर येथे नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ नमो संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान मंत्री गावित यांच्या या विधानामुळे सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात राज्याचे मंत्री कमी पडले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.