मुंबई : राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्या हितांकडे कानाडोळा केल्याचा आरोप करीत मुंबई मेटल असोसिएशनने मुंबईतून आपला गाशा गुंडाळत गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मेटल इंडस्ट्रीच्या या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपा व सेनेने एकमेकांवर निशाणा साधणे सुरू केले आहे.राज्यात आधीच वीजटंचाई आहे. त्यातच जैतापूरसारखे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत तर मेटल असोसिएशनसारखे उद्योग गुजरातमध्येच जातील, असे सांगत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. जैतापूर प्रकल्पासाठी शिवसेनेचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच व्यापाऱ्यांना सवलती मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनाच्या असणाऱ्या विरोधामुळे उद्योजक गुजरातमध्ये जात असल्याचा एकनाथ खडसे यांचा दावा शिवसेनेने साफ फेटाळून लावला आहे. मेटल इंडस्ट्रीच्या गुजरात गमनामागे व्यापाऱ्यांच्या अर्थविषयक समस्या आहेत. व्यापाऱ्यांनी ज्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली ती खाती भाजपाकडे असल्याचे सांगत उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांनी चेंडू भाजपाच्या कोर्टातच परतवला आहे. निवडणुकीदरम्यान भाजपाने उद्योगांना महाराष्ट्रात जागा देऊ, असे आश्वासन दिले होते त्याची अद्याप पूर्तता करण्यात आली नाही. स्थानिक स्वराज संस्था कर हटविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आमच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्री साधी भेटही देत नाहीत. व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत सहा महिन्यापासून राज्य सरकारशी पत्र व्यवहार सुरु आहे. मात्र, त्याला कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत मेटल असोसिएशनने मुंबईतील कारभार गुजरातमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. अहमदाबाद जिल्ह्यातील अडालज गावाजळ इंडस्ट्रीयल पार्क उभे राहणार असून अनेक व्यापा-यांनी येथे नोंदणीही केली आहे. व्यापा-यांना या इंडस्ट्रीयल पार्ककडे आकर्षित करण्यासाठी फ्लॅट, दुकाने आणि प्रशस्त गोदाम उपलब्ध करुन देण्याचे आमिष गुजरातकडून दाखविण्यात येत आहे. राज्यात उद्योग आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार केल्याचा दावाही भाजपा नेते करत असतात. मेटल असोसिएशनच्या निर्णयाने भाजपा नेत्यांचा दावा पोकळ असल्याचे दाखवून दिले आहे. विविध विषयांवरुन आधीच सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत चकमकी झडत असताना त्यात मेटल इंडस्ट्रीची भर पडली आहे. आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच शिवसेनाही या मुद्दयावरुन भाजपाला घेरण्याची शक्यता आहे.
मेटल इंडस्ट्रीच्या निर्णयावरून युतीत धुसफुस
By admin | Published: May 18, 2015 4:45 AM