मनीषा म्हात्रे,
मुंबई-मुलगी तणावाखाली असून तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे तिच्या डायरीमुळे पालकांना कळले. तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारही सुरू करण्यात आले, मात्र तणावामागचे कारण समजण्याआधीच मुलीने आयुष्य संपविले. ही घटना मंगळवारी पवई येथे घडली.पवई आयआयटी इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख हेमचंद्र सेशा नंदयाला (४९) आयआयटी कॅम्पसमधील बी बंगलोत मुलगी सरोजा आणि पत्नीसोबत १९ वर्षांपासून राहतात. मंगळवारी रात्री ८च्या सुमारास सरोजा काही न सांगता घराबाहेर पडली. ८.२५ च्या सुमारास तिने शेजारील शिवालिक इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. याबद्दल सुरक्षारक्षकांकडून कुटुंबीयांना कळले. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. पवई पोलिसांनी सरोजाचा मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या एकुलत्या एक सरोजाने चार महिन्यांपूर्वीच इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपविण्याची इच्छा ‘पर्सनल डायरीत’ लिहून ठेवली होती. बारावीची परीक्षा सुरू असतानाच तिने असे लिहिले होते. ही डायरी तिच्या वडिलांच्या हाती लागली. त्यांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले. सरोजा कशामुळे तणावाखाली आहे, याचा शोध लागण्यापूर्वीच नंदयाला कुटुंबीयांवर हा दु:खाचा डोंगर कोसळला. सरोजाला जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घ्यायचा होता.