तस्कर गजाआड : गुन्हे शाखेची कामगिरी नागपूर : बनावट नोटांची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या बांधून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून सव्वातीन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. गणेश ऊर्फ उदयसिंग बालूजी निमजे (वय ४९) असे आरोपीचे नाव आहे. तो विणकर कॉलनीतील नवशक्ती प्राथमिक शाळेजवळ राहतो. गोळीबार चौकात आज सकाळी बनावट नोटांची खेप घेऊन एक इसम येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला कळली. त्यानुसार सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश देसाई, एपीआय अतुलकर, पीएसआय अब्दुल वहाब, नायक प्रकाश सिडाम, हवालदार मंगेश, हवालदार प्रमोद कोहळे, मनीष भोसले, कुलदीप पेटकर, महिला शिपाई रुबिना, फिरोज आदींनी गोळीबार चौकात आज सकाळपासूनच सापळा लावला. १० च्या सुमारास एका पानटपरीवर निमजे आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्यामुळे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी निमजेकडे धाव घेतली. झडतीनंतर त्याच्याजवळच्या पॉलिथिनमध्ये ५००च्या ४० नोटा आढळल्या. या सर्व कोऱ्या करकरीत नोटा एकाच क्रमांकाच्या (जेक्यूएल-५२६८३८) होत्या. निमजेला हिसका दाखवताच काही नोटा आपल्या मैत्रिणीच्या घरी दडवून ठेवल्याचे सांगितले. मैत्रिणीच्या घराची पोलिसांनी तपासणी केली असता त्यांना १ हजारांच्या ९० (६बीकेओ ४३२४८) तसेच ५००च्या ४२५ नोटांची दोन बंडले आढळली. पोलिसांनी एकूण ३ लाख २२ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. (प्रतिनिधी)नोटा आणल्या कुणाकडून?आरोपी निमजेने एवढ्या मोठ्या प्रमाणात या बनावट नोटा आणल्या कुठून, असा प्रश्न आहे. ओळखीच्या एका इसमाने या नोटा आपल्याला दिल्याचे निमजे सांगतो. तो इसम कोण अन् निमजे कितपत खरा बोलतो, त्याची शहानिशा केली जात आहे. शानशौकाने फोडले बिंगआरोपी निमजेला जुगारासह अनेक व्यसने असल्याचे बोलले जाते. कोणताही कामधंदा न करता तो शानशौक करतो. जुगारात पैसे उधळतो, ही बाब लेंडी तलाव परिसरात चर्चेचा विषय ठरली होती. ती चर्चा पोलिसांच्या कानावर पोहोचली अन् आरोपी निमजेचे बिंग फुटले.
सव्वातीन लाखांच्या बनावट नोटा जप्त
By admin | Published: July 24, 2014 1:07 AM