कडा (बीड) : बनावट नोटा तयार करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अंभोरा पोलिसांना यश आले असून दोन मुख्य आरोपींना नवी मुंबईतून, तर तिघांना आष्टी तालुक्यातील उंदरखेड येथून अटक करण्यात आली आहे. हसमुख पटेल, अनिकेत केदारे (दोघे बेलापूर, नवी मुंबई), राजू भास्कर वामन, जीवन बाबासाहेब वामन आणि शैलेश अंबादास वामन (सर्व रा. उंदरखेल, ता. आष्टी) अशी त्यांची नावे आहेत. मुंबई-बीड कनेक्शन असलेल्या या रॅकेटमध्ये आणखी कोणी गुंतले आहेत काय, याचा शोध घेतला जात आहे. राजू, जीवन आणि अंबादास या तिघांनी २ मे रोजी आष्टी तालुक्यातील धानोरा येथे एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिलापोटी १०० रुपयांच्या बनावट नोटा दिल्या. हॉटेलचालकांना संशय आल्याने या तिघांसह त्याने पोलीस ठाणे गाठले. नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १०० रुपयांच्या ५० नोटा जप्त केल्या. या टोळीची पाळेमुळे नवी मुंबईतील बेलापुरात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी राजूच्या मदतीने सापळा रचला. १०० रुपयांच्या आणखी ५० नोटा हव्या असल्याचे राजूने फोनवर हसमुख पटेल आणि अनिकेत यांना सांगितले. १० मे रोजी पोलिसांनी बेलापुरात एका संगणकाच्या दुकानात सापळा रचून या दोन मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याजवळील बनावट नोटा छापण्याचे रंगीत झेरॉक्स मशिन, प्रिंटर, दोन दुचाकी आदी साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद
By admin | Published: May 13, 2014 3:42 AM