लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कात्रज भागात राहणा-या एका उच्चशिक्षित तरुणीला रात्री-अपरात्री वेगवेगळ्या व्यक्तींचे फोन येऊ लागल्याने ती हैराण झाली होती. फोनवरील व्यक्तीला माझा नंबर कोणी दिला, अशी या तरुणीने चौकशी केल्यावर तुमच्या नावाचे फेसबुक अकाउंट असून, त्यावर तुमचा फोटो व मोबाइल नंबर असल्याचे तिला सांगण्यात आले़ दुस-या दिवशी या तरुणीने सायबर कॅफेमध्ये जाऊन स्वत:चे फेसबुक अकाउंट चेक केल्यावर तिच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट व त्यावर तिचा फोटो व मोबाइल नंबर अपलोड केल्याचे दिसून आले़ सायबर क्राईम सेलने याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे़नितीन दत्तात्रय बंड (वय २८, रा़ जळगाव जामोद, जि़ बुलडाणा) असे या तरुणाचे नाव आहे़ भारती विद्यापीठ पोलिसांकडे या तरुणीने फिर्याद दिली आहे़सायबर क्राईम सेलमार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता़ त्यानुसार या सेलने पीडित तरुणीच्या फेसबुकबाबतची माहिती प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले़ त्यावरुन हे बनावट अकाउंट नितीन बंड याने तयार केले असल्याचे निष्पन्न झाले़ त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली तेव्हा हा आरोपी तरुण व पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत़ त्यांच्यात वैयक्तिक वाद झाला होता़ त्यातून बदनामी करण्यासाठी त्याने तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले व त्यावर तिचा फोटो व मोबाईल नंबरही अपलोड केला होता़ही कामगिरी सायबर क्राईम सेलच्या पोलीस उपनिरीक्षक सोनाली फटांगरे, पोलीस नाईक अजित कुरे, नितेश बिचेवार, शुभांगी मालुसरे यांनी केली़फेसबुक या सोशल वेबसाईटवर बनावट अकाउंट तयार करून तरुणींना त्रास देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत़ त्यामुळे आपले फोटो शेअर करताना काळजी घ्यावी़ आपल्यासोबत किंवा आपल्याजवळील व्यक्तिंसोबत असा काही प्रकार झाल्यास त्वरित सायबर क्राईम सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़
बनावट फेसबुक अकाउंट, तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 2:55 AM