मुंबई : मुंबईच्या पश्चिम विभागात शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी बनावट उत्पन्नाच्या दाखल्याचा वापर केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम विभागातील चार शाळांनीच पालकांनी केलेला घोटाळा उघडकीस आणला आहे.गोरेगाव येथील यशोधाम, लक्षधाम, गोकूळधाम आणि अंधेरीतील सीटी इंटरनॅशनल स्कूल या शाळांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. येथील एकूण १३२ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अंधेरी आणि बोरीवली तहसीलदारांच्या नावाने बनावट उत्पन्नाचे दाखले शाळांमध्ये सादर केले. मात्र संबंधित शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयात याची शहानिशा केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. आरटीईच्या २५ टक्के प्रवेशाच्या कोट्यातून आर्थिक दुर्बल गटातून सन २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये प्रवेशित झालेल्या बालकांपैकी गोरेगावच्या यशोधाममधील ६६, लक्षधाममधील २३ आणि गोकूळधाममध्ये ३६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी बनावट उत्पन्नाचे दाखले सादर केले. तर अंधेरीच्या सीटी इंटरनॅशनल शाळेतील सात विद्यार्थ्यांच्या पालकांकडून बनावट उत्पन्नाचे दाखले सादर करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान नाहीदोषी पालकांमध्ये काही पालकांचे उत्पन्न खरोखरच कमी आहे. मात्र वेळेत दाखला मिळवण्यासाठी त्यांनी गैरमार्गाचा वापर केल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या पालकांनी प्रवेशानंतर कायदेशीर मार्गाने उत्पन्नाचा दाखला सादर केला आहे, त्यांच्याप्रती सहानुभूतीचा विचार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केला आहे. शिवाय त्यांच्या पाल्यांचे प्रवेश रद्द न करता संबंधित शाळांना मार्गदर्शनासाठी पत्रव्यवहार करण्याचा सल्लाही कार्यालयाने दिला आहे.
प्रवेशासाठी बनावट उत्पन्नाचा दाखला !
By admin | Published: June 18, 2016 1:13 AM