चेतन ननावरे / मुंबईकेंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोलपंप चालकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली. त्यानंतरचे चार दिवस दिवसरात्र सर्वच पेट्रोलपंपांवर एकच गर्दी उसळली. याचाच गैरफायदा घेत, हजारो वाहन चालकांनी पेट्रोलपंपांवर बनावट नोटा खपवल्याची माहिती फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनने (फामपेडा) दिली.फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध म्हणाले की, केंद्राच्या निर्णयानंतर प्रत्येक वाहन चालकाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा संपवण्यासाठी तितक्याच रकमेचे पेट्रोल आणि डिझेल टाकण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पेट्रोलपंप चालकांना मारहाणही झाली. परिणामी, पुढील चार दिवस पोलीस संरक्षणाखाली पेट्रोलपंपांबाहेर चालकांनी रांगा लावल्या होत्या. याच रांगेतून छोट्या पंपांवर सरासरी पाच हजार, तर मोठ्या पंपांवर १० हजार रुपयांपर्यंत बनावट नोटा आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे साडेचार हजार पेट्रोलपंप चालकांना, सव्वादोन कोटींहून अधिक रुपयांच्या बनावट नोटांचा भुर्दंड सहन करावा लागल्याचे लोध यांनी सांगितले. यामुळे पेट्रोलपंप चालकांचे आर्थिक नुकसानीसोबतच वेळेचेही नुकसान होत असल्याचे फामपेडाने स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवत, पेट्रोलपंप चालकांना ५० हजार रुपयांपर्यंत रोकड काढण्याची शिफारस केली आहे. तसे झाल्यास पेट्रोलपंप चालकांना मोठा दिलासा मिळेल, असेही फामपेडाचे म्हणणे आहे.
पेट्रोलपंपांवर बनावट नोटांचा भडका!
By admin | Published: November 17, 2016 4:32 AM