ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - शहरात नियोजनबद्ध पार्किंगसाठी पालिकेने ठेकेदारांची नियुक्ती केली़. मात्र या ठेकेदारांनी पे अॅण्ड पार्कमध्ये बनावट पावती देऊन मुंबईकर आणि पालिका प्रशासनाची फसवणूक केली असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन जणांना अटक झाली आहे.महापालिकेने राज इंटरप्रायजेस आणि ग्लोबल पॉवर सिस्टम या ठेकेदारांना पे अॅण्ड पार्कचे कंत्राट दिले होते. पालिकेने नेमून दिलेल्या जागेवर ठरवून दिलेल्या दरामध्ये पार्किंगची सुविधा देणे बंधनकारक होते. परंतु ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाहन मालकांकडून जास्त दर हे ठेकेदार वसूल करीत असल्याचे उजेडात आले़ बनावट पावत्या देऊन राजरोस मुंबईकरांना लुटले जात होते.या कंपनीने पालिकेला दिलेले धनादेशही वटले नव्हते. राज इंटरप्रायजेसकडून एक कोटी ४९ लाख रुपये तर ग्लोबल पॉवर सिस्टमचे दोन कोटी ३८ लाख रुपये पालिकेला येणे आहेत. त्यामुळे पालिकेने या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकत माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदिवला आहे. या प्रकरणात आबिद जब्बार अली आणि असगर अलीला अटक करण्यात आली आहे. नरीमन पॉर्इंट येथील विनय शाह मार्ग आणि मरीन ड्राईव्ह येथील जमनालाल बजाज मार्ग या दोन ठिकाणी बनावट पावत्या दिल्या जात होत्या़