पुणो : आघाडी होणार, न होणार अशा गेल्या वर्षभरापासून होणा:या चर्चेवर काँग्रेस-राष्ट्रवादी अधिकृत आघाडीची घोषणा झाल्याने अखेर पाणी पडले. इंदापूर, भोर अशा मतदारसंघांमधील इच्छुकांचे मनसुबे फोल गेले असून, अपक्ष किंवा अन्य पक्षीय पर्याय शोधण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांपुढे मोठी चिंता निर्माण झाली आहे.
दोन्ही काँग्रेसमधील आघाडीविषयी अनेक दिवसांपासून संभ्रम होता.आघाडी झाल्यानंतरही सुप्तपणो पाडापाडीचे उद्योग होत असल्याने या आघाडीवर जाणकारांचा विश्वास नाही. आघाडी होणार नाही, असे गृहीत धरून काही इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात जोमाने तयारी सुरू केली होती. प्रदेश काँग्रेसने तर सर्व शहर व जिल्ह्याच्या अध्यक्षांना सर्व मतदारसंघांसाठी इच्छुकांचे अर्ज मागवावेत, अशा सूचना केल्या.
दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली. पवार यांनी या वेळी कोणत्याही परिस्थितीत स्वबळाची भाषा होणार नसल्याचे अभिवचन दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
आघाडीचे वृत्त पसरल्यानंतर इच्छुकांमध्ये वेगळे विचार सुरू झाले. अपक्ष लढण्याची किंवा अन्य पक्षांचा पर्याय चोखाळण्याची तयारी काही जणांनी सुरू केली आहे. इंदापूर मतदारसंघातून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष लढत दिलेले दत्तात्रय भरणो यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे. या तालुक्याचे सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलेल्या हर्षवर्धन पाटील यांना नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चंग बांधला होता. गेल्या वेळी भरणो यांनी मोठय़ा प्रमाणात मते घेतली होती. आघाडी न झाल्यास बंडखोरी करण्याचे वक्तव्य भरणो यांनी मध्यंतरी अनेकदा केले होते. आज अधिकृत आघाडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी याविषयी भाष्य टाळून वेट अँड वॉच असे सूचकपणो सांगितले.
भोर तालुक्यात काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या विरोधात रणजित शिवतरे, मानसिंग धुमाळ, भालचंद्र जगताप यांच्यासह मुळशीतील आत्माराम कलाटे, राजाभाऊ हगवणो, तसेच वेल्ह्यातील रेवणनाथ दारवटकर या राष्ट्रवाद्यांनी शड्ड ठोकला आहे. या तालुक्यात आघाडी धर्माचे पालन होणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात उघड बंड करणा:या शरद बुट्टे पाटील, नाना टाकळकर, बाबा राक्षे, सुरेश गोरे यांची आघाडीनंतरही भूमिका काय असेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिरूर हवेली या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद यांनी ‘अभी नही तो कभी नही’ असा निश्चय करीत लढण्याचा इरादा जाहीर केला आहे. विद्यमान आमदार अशोक पवार हेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून, या ठिकाणाहून मंगलदास बांदल यांनीही तीव्र इच्छा व्यक्त केली आहे.
आंबेगाव तालुका मतदारसंघात शिरूरमधील अनेक गावे असल्याने या मतदारसंघातून लढण्याची इच्छा बांदल यांच्यासह माजी आमदार पोपटराव गावडे, भाऊसाहेब ¨शंदे आदींनी व्यक्त केली आहे. दौंडमधून रमेश थोरात यांच्या विरोधात राहुल कुल यांनी स्वतंत्र मेळावा घेऊन शड्ड ठोकला आहे. पुरंदरमध्ये शिवसेनेचा आमदार गेल्या वेळी निवडून आला असला तरी अशोक टेकवडे, जा¨लंदर कामठे या राष्ट्रवादीतील इच्छुकांसोबतच काँग्रेसचे संजय जगताप यांनीही लढण्याची तयारी सुरू केली होती.
खडकवासला मतदारसंघातही राष्ट्रवादीला यश मिळत नसल्याने हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा, अशी मागणी श्रीरंग चव्हाण पाटील आदी काँग्रेस जनांनी केली होती. राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आलेल्या या मतदारसंघातील चित्र काय असणार, याविषयीही उत्सुकता आहे.