यवतमाळ : राज्य पोलीस दलात खात्यांतर्गत फौजदारांच्या १९०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात १९८० ते ९० या काळात भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदार होण्याची संधी मिळणार आहे. राज्य पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. व्हटकर म्हणाले, की २०१३ ला खात्यांतर्गत फौजदार पदासाठी परीक्षा घेताना १९०७ जागा रिक्त होत्या. त्यावेळी पुढील तीन वर्षांत सेवानिवृत्तीद्वारे रिक्त होणाऱ्या संभाव्य जागांचा त्यात समावेश करण्यात आला होता. या जागांवर परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेनुसार पात्र ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदार म्हणून नियुक्तीही देण्यात आली होती. परंतु नंतर न्यायालयाने त्यावर स्थगनादेश दिला. त्यामुळे पुढे या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात (अॅडहॉक) नियुक्त्या देण्यात आल्या. त्याच कर्मचाऱ्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाने स्थगनादेश उठविल्याने स्थायी स्वरूपात फौजदार म्हणून नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. १९८० नंतर पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना या जागांवर संधी मिळू शकते, असेही व्हटकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल फौजदार पदासाठी खात्यांतर्गत परीक्षेद्वारे पात्र ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्त्या द्याव्यात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २१ डिसेंबर रोजी दिले आहेत. शिवाय ‘मॅट’चा ‘सहायक फौजदारच पात्र’ हा आदेश रद्द ठरविला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला ‘मॅट’मधील मूळ याचिकाकर्त्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वोच्च न्यायालयात आधीच ‘कॅव्हेट’ दाखल करून ठेवला आहे.
फौजदारांच्या १,९०७ जागा भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2017 1:13 AM