"परमबीर सिंग यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला.
NIA ने जे चार्जशीट दाखल केले आहे त्यामध्ये सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले होते असे सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
NIA ने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. एक्स्टॉरशनच्यासाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे याने केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही. बरंच काही यातून बाहेर येऊ शकत होतं परंतु NIA ने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.