पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच आता भारतीय जनता पक्षातही धुसफूस सुरू झाली आहे. भाजपाने शहर पदाधिकाऱ्यांची १४४ जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. पहिल्या यादीत डावलल्याने भाजपाविरुद्ध संघ असा संघर्ष सुरू होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, बोभाटा होण्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्याने वादावर पडदा पडला.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्याने पिंपरीतील भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टक्कर देणारा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने सक्षम शहराध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेत ‘अब की बार...’ अशी चर्चा शहरात रंगली आहे. नाराजांना आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँगे्रसमधील विद्यमान नगरसेविकांचे पती, तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांना भाजपात घेतले आहे. भाजपाच्या शहराध्यक्षपदाचे खांदेपालट झाल्याने तब्बल चार महिन्यांनी मागील आठवड्यात शहराध्यक्षांनी शहर कार्यकारिणीचा विस्तार केला. खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आमदार जगताप यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसोहब दानवे असे समर्थकांचे प्रमुख गट आहेत. ‘भाजपा हा आमचा एकमेव गट आहे’ असे वर वर भाजपातील स्थानिक नेते दाखवीत असले, तरी प्रत्येक जण अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करीत आहेत. भाजपाची शहराध्यक्षपदाची सूत्रे जगतापांकडे असली, तरी विविध गटांची मोट बांधण्याचे आव्हान शहराध्यक्षांसमोर आहे. (प्रतिनिधी)
भाजपा-संघात धुसफूस
By admin | Published: May 31, 2016 2:02 AM