मुंबई : अरबी समुद्रातील नरिमन पॉइंट ते राजभवन दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यास मच्छीमार संघटनांनी हरकत घेतली आहे. या परिसरात भराव घातल्याने येथील कोळी बांधव उद्ध्वस्त होणार असून चैत्यभूमी किनाऱ्यालाही धोका निर्माण होणार असल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तांडेल म्हणाले, ‘शिवस्मारकास मच्छीमारांचा विरोध नसून त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणांमाबाबत हरकत आहे. या ठिकाणी स्मारक तयार झाल्यास पर्यटकांच्या रूपात आलेल्या अतिरेक्यांमार्फत थेट राजभवन किंवा मंत्रालयावर अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता आहे. परिणामी सागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर टाकलेल्या भरावामुळे उभ्या शहरातील समुद्रकिनाऱ्यांना लाटांचा तडाखा सहन होत नाही. अशा परिस्थितीत नरिमन पॉइंट येथे भराव टाकल्यास लाटांचा मारा दादर चौपाटीवरील चैत्यभूमीला बसणार आहे. त्यामुळे चैत्यभूमी ढासळण्याची शक्यता तांडेल यांनी व्यक्त केली.याशिवाय वाहतूककोंडीने त्रस्त असलेल्या दक्षिण मुंबईसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्मारक उभारून त्या त्रासात भर पडणार आहे. मंत्रालयासोबत मंत्र्यांचे बंगले आणि प्रमुख शासकीय कार्यालये असलेल्या ठिकाणी असे स्मारक उभारल्यास वाहतूककोंडीत भर पडणार आहे.तरंगते हॉटेल, सी-प्लेनला विरोधमुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या सी-प्लेन व भविष्यात सुरू होणाऱ्या तरंगते हॉटेल (फ्लोटिंग रेस्टॉरंट) प्रकल्पास संघटनेने कडाडून विरोध केला आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबईची सागरी सुरक्षाच धोक्यात येणार असल्याचा संघटनेचा दावा आहे. सी-प्लेनद्वारे अतिरेकी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी घुसखोरी करू शकतात, असेही संघटनेचे म्हणणे आहे.तरंगत्या हॉटेलच्या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार असून त्यात नेमका कोणाचा पैसा वापरला जात आहे, याची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी तांडेल यांनी केली आहे. माहितीच्या अधिकाराखाली समोर आलेल्या माहितीत तरंगत्या हॉटेलचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर झालेला नाही. शिवाय पर्यावरण खात्यासह विविध १५ विभागांच्या आवश्यक परवानग्या नसतानाही माजी पर्यटन विकासमंत्री छगन भुजबळ यांनी त्याचे उद्घाटन केलेच कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. परिणामी तरंगत्या हॉटेलचा प्रकल्प सुरू केल्यास मुंबईतील ५ हजार मच्छीमार नौका हॉटेलला समुद्रात घेराव घालून पर्यटकांची तटबंदी करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)स्मारकाला बॅण्डस्टॅण्डचा पर्यायपश्चिम उपनगरांतील वांद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टॅण्ड आणि कार्टर रोड या ठिकाणी असलेल्या खडकाळ भागात स्मारक उभारल्यास म्हणावे तितके नुकसान होणार नाही, असे तांडेल यांचे म्हणणे आहे. तिथे काही प्रमाणात मच्छीमार समाज असून स्मारक तयार केल्यावर मच्छीमारांचे पुनर्वसन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शिवस्मारकाच्या जागेला मच्छीमारांचा विरोध
By admin | Published: January 01, 2015 1:38 AM