मुंबई : अनाथ, निराधार आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या निवासी संस्थांप्रती कमालीची अनास्था आहे. हिवाळी अधिवेशनात या खात्याच्या मंत्र्यांनीच बालगृहांची आणि त्यातील बालकांच्या संख्येची विसंगत आकडेवारी सांगून दिशाभूल केल्याचा आरोप बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेने केला आहे. ९१ हजार ३४४ ऐवजी १४ हजार बालके असल्याची चुकीची माहिती मंत्र्यांनी दिल्याचा तसेच ही आकडेवारी तीन वर्षांपूर्वीची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.स्वयंसेवी बालगृहांच्या थकीत भोजन अनुदानाचा प्रश्न आमदार अतुल सावे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात दोन ते तीन वर्षांपूर्वीची ११०५ बालगृहांत ९१ हजार ३४४ बालके असल्याची जुनी आकडेवारी देत आजची वस्तुस्थिती दडविली. प्रत्यक्षात ७५० संस्थांमध्ये १४ हजार बालके आहेत. २१५ बालगृहांची मान्यता गेल्या महिन्यातच रद्द केलेली असताना संस्थांचा आकडा फुगवून सांगण्यामागची मंत्र्यांची भूमिका चुकीची असल्याचे बालगृह चालक संघटनेने म्हटले आहे.दरम्यान, सभागृहात सदस्यांच्या प्रश्नांना मोघम उत्तरे देऊन बालगृहांच्या मूळ प्रश्नांना भिजत ठेवण्याच्या ‘महिला बालविकास’च्या नकारात्मक वृत्तीचा फटका बालकांना बसत आहे. ‘बालगृह’या महत्त्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडत असल्याचे बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रवींद्रकुमार जाधव यांनी सांगितले.
निराधार बालकांबाबत मंत्र्यांकडून चुकीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 4:31 AM