पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मात्तबर मोहरे फोडण्यास भारतीय जनता पक्षाने सुरुवात केल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी नगरसेवकांची तातडीची बैठक आकुर्डीत बोलावली आहे. पळवापळवीची दखल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली असून, पक्षफुटीवर चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे पद असतानाही भाजपात प्रवेश करणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला तिन्ही मतदारसंघात अपयश मिळाले. पक्षांतर्गत गटबाजीचाही फटका बसला. दोन्ही निवडणुकांत भाजपाला यश मिळाले. राष्ट्रवादीला रामराम करून लक्ष्मण जगताप भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले. पवारांच्या पॉवरला टक्कर देणारा सक्षम नेतृत्व म्हणून आमदार जगताप यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. शिक्षण मंडळाचे विद्यमान सदस्य, माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवक भाजपात दाखल झालेले आहेत. (प्रतिनिधी)>पदे काढून घ्याराष्ट्रवादीचे पद भूषविणाऱ्या अनेक सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्यावर राष्ट्रवादीने कारवाई केलेली नाही. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर पक्षनेतृत्वाने कारवाई करावी, अशी मागणी शहरातील राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे. कारवाईची भीती निर्माण झाल्यास पक्ष सोडण्याची हिंमत कोणीही करणार नाही, अशीही अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
फुटीर नेत्यांवरून ‘राष्ट्रवादी’त धुसफूस
By admin | Published: June 09, 2016 2:01 AM