लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी संपामध्ये सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असा उल्लेख असलेले पत्र सोमवारी व्हायरल झाले होते. त्यावर एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांची (कर्मचारी वर्ग) स्वाक्षरी होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, हे पत्र खोटे असून, या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी १० मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली होती.
एसटी संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा आशयाचे ७ मार्चला एक खोटे परिपत्रक व्हायरल झाले होते. त्यानंतर हे परिपत्रक पूर्णतः खोटे व बनावट असल्याचे स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. याशिवाय खोटे पत्र तयार करण्याऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तत्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार एसटी महामंडळाच्या वतीने पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
संपात सहभागी असलेले एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी, असे एक पत्र समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. वास्तविक, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही, शिवाय अशा प्रकारचे कोणतेही पत्र महामंडळाने जारी केले नाही. - शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ