कोण जाणार ? : मेघे समर्थकांची सावध भूमिका नागपूर : माजी खा. दत्ता मेघे यांनी काँग्रेसला रामराम केला. मेघे यांचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक समर्थक आहेत. गतकाळात मेघेंनी राष्ट्रवादी सोडली तेव्हा नागपूर शहरातील समर्थक त्यांचेसोबत काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा होती. ती चर्चाच राहीली. आता त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा अशीच अफवा पसरली आहे. त्यातच माजी आ. गिरीश गांधी यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत मागील काही वर्षांपासून सुरू असलेली धुसफूस बाहेर पडली. यावर मेघे समर्थकांनी सावध भूमिका घेतली आहे.दोन्ही काँग्रेसमध्ये मेघे समर्थकांची संख्या मोठी आहे. यातील अनेक नेते मेघे यांच्या बंगल्यावर आवर्जून भेटीसाठी जातात. राष्ट्रवादीचे नगरसेवक कामील अन्सारी, अण्णाजी राऊ त, रघुनाथ मालीकर, मेहमूद अन्सारी, नारायण आहुजा अशी अनेक नावे आहेत. गिरीश गांधी यांचाही राष्ट्रवादीत गट आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी या नेत्यांच्या मागे जातील. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु मेघे समर्थक व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सावध भूमिका घेतली आहे. कामील अन्सारी यांनी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मी राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे. शरद पवार माझे नेते आहे. मी याच पक्षात राहणार आहे. मेघे यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक दुनेश्वर पेठे म्हणाले, मी पक्षात समाधानी आहे. पक्ष काही देऊ शकत नाही म्हणून पक्ष सोडणाऱ्यापैकी मी नाही, अशी रोखठोक भूमिका पेठे यांनी मांडली.पक्षाची धुरा नवीन लोकांच्या हाती दिल्याने राष्ट्रवादी पक्षात मागील पाच वर्षांपासून धुसफूस सुरू आहे. यातूनच अशोक धवड यांनी राष्ट्रवादी सोडली. त्यांच्यासोबत समर्थकही गेले. वेदप्रकाश आर्य मनपात गटनेते असताना त्यांनी आंदोलनातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माजी नगरसेवक राजेश माटेही सक्रिय होते. परंतु गटबाजीतून मनपा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने आता शांत आहेत. दिलीप पनकुले, अनिल अहिरकर, रमेश फुले,गंगाप्रसाद ग्वालबंशी, विशाल खांडेकर, मधुकर भावसार, नगरसेवक राजू नागुलवार, दुनेश्वर पेठे, शब्बीर विद्रोही, मोहन खानचंदानी व अशोक काटले अशी नाराजांची मोठी फौज आहे.(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीत धुसफूस
By admin | Published: June 11, 2014 1:06 AM