लोकमत न्यूज नेटवर्कअवसरी : सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या चुकीच्या धोरणाचा फटका आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वैद्यवाडी फाटा ते पोंदेवाडी येथील शेतकऱ्यांना व वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यासाठी लाखो रूपये खर्च होऊनही रस्त्याचा वापर नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करून दाखविल्या आहेत.पारगाव ते धामणी फाटा या रस्त्यावरील वैद्यवाडी फाटा ते पोंदेवाडी असा जवळपास ४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासुन सुरू होते व ते सध्या पूर्ण होत आले आहे. मात्र हा रस्ता करत असताना काठापुर बुद्रुक गावच्या हद्दीतील गणेशवस्तीजवळ या रस्त्यावरून डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची चारी गेली आहे. ही चारी रस्त्यावर पुल बांधुन गेली आहे. त्यामुळे चारीखालून जाणारा रस्ता खोल केला आहे. या ठिकाणी पावसाचे व कालव्याचे पाणी या चारीखालील रस्त्यावर साचते. हे पाणी तीन ते चार फुटांपर्यंत साचत असल्याने तेथुन वाहतुक करता येत नाही. अनेक वाहने या ठिकाणी बंद पडतात. त्यामुळे वाहतुक करणारे वाहनचालक हा रस्ता नवीन असुनही वापरत नाही. या ठिकाणी रस्त्याची उंची दोन्ही बाजुचा रस्ता ४ फूट उंच आहे. मात्र या पाण्याच्या चारी खाली तो चार फुट खोल आहे. कारण येथे रस्त्यांची उंची वाढवली तर वाहने पाटाच्या चारीच्या पुलाला अडकतात. त्यामुळे रस्त्याची उंची वाढवता येत नाही. ही चारी बांधुन ८ ते १० वर्ष उलटली आहे. परंतु या चारीला पाणी अजुनही आले नाही. कारण ही चारी रस्त्यावरती जितकी उंच आहे. त्यापेक्षा पुढे ती जास्त उंच आहे. त्यामुळे या चारीत जमिनी जावुनही येथील शेतकऱ्यांना अजुन पाणी मिळाले नाही. पाणी शेतीसाठी मिळाले नाही. मात्र हे पाणी रस्त्यावर साचते. व रस्ता बंद होतो.सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या चुकीच्या धोरणाचा फटका येथील शेतकऱ्यांना व वाहनचालकांना बसत आहे. चारीची उंची कमी असल्याने काठापुर गावाला मागील दहा वर्षात चारीचे काम होऊनही पाणी मिळाले नाही. कारण पाणी पुढे जातच नाही. वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी पाटाच्या पाण्याचे प्रयत्न सोडून दिले आहे. पाणी तर येतच नाही. कारण या चारीची उंची कमी असल्याने या चारीखालुन असणारा रस्ता खोल केला गेला आहे.
चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका
By admin | Published: June 08, 2017 1:12 AM