ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 25 - जातीमध्ये घेण्यासाठी वारंवार जातपंचायतीचे उंबरे झिजवूनही जातीत न घेता जातीतून बहिष्कृत करणाऱ्या तिरमली जात पंचायतीच्या दहा पंचांविरोधात मंगळवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पंचाना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणास वाचा फोडली होती.याप्रकरणी श्रीगोंदा कारखाना येथील मंगल गायकवाड़ या तरूणीने फिर्याद दिली. ‘१२५ वर्षांपूर्वी माझे पंजोबा शेटिबा गायकवाड यांना त्यावेळच्या जात पंचायतीने काही कारणास्तव जातीतून बहिष्कृत केले होते. तेव्हापासून माझ्या व इतर २५ कुटुंबियाना तिरमली समाजाच्या जात पंचायतीने जातीबाहेर काढले. वेळोवेळी आई- वडील,मामांनी जात पंचायतीमध्ये जाण्याचे ठरविले तरी, त्यांना तेथून हाकलून लावले जाते. पंचायतीमध्ये गेल्यास आम्हाला बोलू दिले जात नाही. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगत हाकलून लावले जाते. पंचायतीमध्ये अनामत रक्कम १० हजार भरण्यास तयार असतानाही ती भरुन घेतली नाही. पण १० वर्षांपूर्वी ज्या लोकांना वाळीत टाकले होते, त्यांच्याकडून ४ ते ५ लाख रुपये घेऊन पुन्हा जातीत घेतले. याबाबत पंचांची भूमिका संशयास्पद व अन्यायकारक आहे. आमच्यासोबतच राहुरी येथील काही कुटुंबाना वाळीत टाकले आहे. आम्हाला व इतर नातेवाईकांना वाळीत टाकल्यामुळे माझ्यासह आमच्या कुटुंबातील तरुण, तरुणींचे विवाह जमत नाही. त्याचबरोबर आमच्या समाजाच्या कुठल्याही लग्न समारंभात जेवणाच्या पंक्तीत बसू दिले जात नाही, ही बाब अन्यायकारक आहे.’ असे फिर्यादीत म्हटले आहे.
सव्वाशे वर्षांपासून कुटुंब बहिष्कृत
By admin | Published: October 25, 2016 8:40 PM