पुणे : विवाहीत असतानाही घटस्फोटीत महिलेशी दुसरा घरोबा थातून तिला मारहाण करुन छळ केल्याच्या आरोपाखाली मनसेचे शहर सचिव असलेल्या बाबा चिटणीस यांच्याविरोधात कौटुंबिक अत्याचार कायद्यान्वये छळाचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष रमाकांत चिटणीस उर्फ बाबा (वय ४४, रा. लेक टाऊन सोसायटी, बिबवेवाडी) असे त्यांचे पुर्ण नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी स्वाती (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. स्वाती आणि बाबा यांचे लग्न २०११ साली झाले होते. स्वाती या घटस्फोटीत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. ही मुले सध्या त्यांच्यासोबतच राहण्यास असून त्यांचे शिक्षण सुरु आहे. त्यांची ओळख झाल्यावर बाबा यांनी आळंदी येथे स्वाती यांच्याशी लग्न केले. त्यावेळी बाबा यांनी ते विवाहीत असल्याचे लपवून ठेवल्याचे स्वाती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. २०११ साली लग्न झाल्यानंतर बाबा यांनी त्यांच्यावर बंधने लादायला सुरुवात केली.लग्न झाल्यापासून ते ८ मे २०१४ पर्यंत बाबा यांनी चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक छळ केल्याची तक्रार स्वाती यांनी केली आहे. नेहमी वाईट शिवीगाळ करणे, हाताने मारहाण करुन जबर दुखापत करण्याचे प्रकारही अनेकदा घडले. पहिले लग्न झालेले असतानाही ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवून पतीने फसवणूक केल्याचा आरोप स्वाती यांनी केला आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यावर बाबा चिटणीस हे गायब झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून त्यांना लवकरच अटक केली जाईल असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. बी. चव्हाण यांनी सांगितले.
मनसेच्या बाबा चिटणीस विरोधात कौटुंबिक फसवणुकीचा गुन्हा
By admin | Published: May 10, 2014 8:07 PM