अहमदनगर : जवखेडे खालसा येथे झालेली तिघांची हत्या ही कौटुंबिक कारणातून झाली आहे. रागाच्या भरात आरोपीने हे दुष्कृत्य केले असून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनेच मृतदेहाचे तुकडे करून ते विहिरीत, बोअरवेलमध्ये टाकण्यात आले. या प्रकरणात अटक झालेला प्रशांत जाधव याचा हत्याकांडात सहभाग स्पष्ट झाला आहे. तसे पुरावे मिळाल्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, तो प्रमुख आरोपी आहे की सूत्रधार? हे मात्र पोलिसांनी स्पष्ट करण्यास नकार दिला.तब्बल ४३ दिवसांनंतर जवखेडे हत्याकांडाच्या तपासाला गती मिळाली आहे. सहा संशयितांच्या वैज्ञानिक चाचण्या झाल्या. त्यामध्ये एका महिलेने दिलेल्या जबाबात प्रशांत जाधव याचे नाव पुढे आले. त्यानंतर प्रशांतवर आधी वैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या चाचण्या पॉझिटिव्ह मिळाल्या. त्यानुसार त्याची नार्को चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. या अहवालात प्रशांतचा हत्याकांडात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले, असे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.दरम्यान, पोलिसांनी बुधवारी दुपारी प्रशांत जाधव याच्या घरामधून रक्ताचे डाग असलेले कपडे, काही शस्त्रे जप्त केली. त्यानंतर जाधव यांच्या नातेवाईकांमध्ये वेगवान हालचाली घडल्या. या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली. याच दरम्यान त्यांना काही पुरावे मिळाले. त्याच आधारे त्यांनी प्रशांत जाधव याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने हत्याकांडात सहभाग असल्याची कबुली दिल्यानेच त्याला आरोपी करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांना एक साक्षीदारही मिळाला. त्याच्या हालचालीवर इतरांनी ठेवलेली नजर, त्यांच्यामध्ये झालेले संभाषण हेच पुरावा म्हणून पोलिसांना मिळाले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रशांत याला अटक करताच आणखी काहीजण फरार झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)
जवखेडा हत्यांमागे कौटुंबिक वाद
By admin | Published: December 05, 2014 3:39 AM